पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये यावर्षी पाचवीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ज्ञानप्रबोधिनी शाळेने प्रवेश परीक्षा घेऊन शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्यामुळे यावर्षीचे पाचवीचे प्रवेश रद्द ठरवण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे. याबाबत बाल हक्क आयोगाकडे अंतिम सुनावणी पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेतील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया घेता येत नाहीत. मात्र, ज्ञान प्रबोधिनी शाळेने प्रवेशपरीक्षेच्या माध्यमातून पाचवीच्या वर्गाचे प्रवेश केले. सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू होण्याच्या तोंडावर प्रवेश प्रक्रिया रद्द करून शिक्षण हक्क कायद्यानुसार ती पुन्हा राबवण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला दिले आहेत. ज्ञानप्रबोधिनी ही शाळा बुद्धिमान विद्यार्थ्यांची शाळा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ‘नवोदय विद्यालया’प्रमाणे या शाळेला प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवण्याची परवानगी मिळावी, असे पत्र शाळेने शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती ज्ञानप्रबोधिनीचे पुण्याचे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी दिली आहे. शाळेला वैशिष्टय़पूर्ण शाळा म्हणून दर्जा मिळावा अशी मागणीही शाळेने केली आहे. प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाविरूद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयही प्रबोधिनीने घेतला आहे.
या सर्व प्रकारामध्ये शिक्षण हक्क कायदा आणि प्रवेशाच्या तांत्रिका बाबींची माहिती नसलेले पालक आणि प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. शाळेने कायद्याचे उल्लंघन करून प्रवेश प्रक्रिया राबवली, त्यावर वेळीच काही कारवाई न करता सर्व शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शाळेची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसला आहे. या प्रवेशांच्या वैधतेबाबतची सुनावणी बाल हक्क आयोगासमोर पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. तोवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे भवितव्य टांगणीवर राहणार आहे.