कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नीचा गळा आवळून खून करीत पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोथरूड येथील भुसारी कॉलनीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत मधुसूदन ताम्हणकर (वय ५८), त्यांची पत्नी साधना हेमंत ताम्हणकर (वय ५६, दोघेही- रा. बांदल क्लासिक, भुसारी कॉलनी, कोथरूड) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत यांना केतन हा एकच मुलगा असून तो आई-वडिलांसोबत भुसारी कॉलनीतील भाडय़ाने घेतलेल्या सदनिकेत राहतो. केतन हा सकाळी बाहेर गेला होता. दुपारी घरी आल्यानंतर त्याला वडील हे घरात पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आले. तर, आईही आतील खोलीत निपचित पडलेली होती. हा प्रकार पाहून केतन घाबरला, त्याने शेजारच्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अरविंद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेमंत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळचे. युको बँकेत अधिकारी म्हणून नोकरीला होते. २००२ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पुण्यात टिळक रस्ता आणि डहाणूकर कॉलनी या दोन ठिकाणी जीमचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी मोठय़ा प्रमाणावर कर्ज घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर एक ते दीड कोटी रुपयांचे कर्ज होते. दरम्यानच्या काळात पत्नीला पॅरालिसिसचा झटका आला. तेव्हापासून त्या अंथरूणाला खिळून होत्या. कर्ज झाल्यामुळे हेमंत यांनी काही वस्तू विकल्या होत्या. ते गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यामध्ये होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पत्नीचा उशीने तोंड दाबून खून करत हेमंत यांनी स्वत: आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी सांगितले.