अवयव दान हे श्रेष्ठ दान असं म्हटलं जात. समाजात याविषयी जनजागृती देखील केली जाते.  मात्र, अवयवदान करण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद सध्याच्या घडीला मिळताना दिसत नाही. अवयदानाचे महत्त्व लक्षात घेत  पिंपरी-चिंचवडमधील म्हस्के दाम्पत्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. या दाम्पत्याने मुलगा तेजस याच्या मृत्यूनंतर अवयव दानाचा निर्णय घेतला. तेजस म्हस्के या तरुणाचा २४ मेला अपघातात मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुलाच्या मृत्यूची बातमी सांगताच त्याच्या जाण्याचे दु:ख दाखवून देण्यापेक्षा क्षणाचा ही विलंब न करता म्हस्के दांम्पत्याने अवयव दानाचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवडमधील रुपीनगर परिसरात राहणाऱ्या म्हस्के कुटुंबियांनी या निर्णयातून समाजापुढे आदर्श ठेवला.  त्यांची मुलगी तनिष्का ही अंध असल्यामुळे म्हस्के दांपत्यांना दिव्यांग व्यक्तींची अवस्था काय असते, याची चांगलीच जाण आहे.

केवळ नेत्रदान न करता त्यासोबत हृदय, किडनी, साधूपिंड हे ही अवयव त्यांनी दान करण्याचा निर्णय घेतला. तेजसचे वडिल अमित म्हस्के यांचा सामाजिक कार्यासाठीच जन्म झाला असावा, कारण अडीच वर्षांपूर्वी अनैतिक संबंधातून एक तरुणी गरोदर राहिली. यावेळी अमित यांनी या तरुणीला आधार दिला. पीडित मुलीने जन्म दिलेल्या मुलीला त्यांनी दत्तक घेतले. एवढेच नाही तर पीडित मुलीचा नव्यानं संसार थाटून दिला. समाजात स्थान न मिळणाऱ्या तृतीय पंथीयांना देखील अमित यांनाही वेळोवेळी मदत केली आहे. त्यानंतर आता त्यांनी लाडक्या तेजसच्या अवयवदानातून समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे.