शहरभर पडलेल्या खड्डय़ांना महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या कसबा युवा मोर्चातर्फे गुरुवारी टिळक चौकात आंदोलन करण्यात आले. टिळक चौकातील खड्डय़ांमध्ये कार्यकर्त्यांनी झाडे लावली आणि महापालिकेचा निषेध केला.
शहरातील सर्व रस्त्यांना पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालक हैराण झालेले असताना महापालिकेतर्फे सध्या खड्डय़ांची तात्पुरती दुरुस्ती आणि डागडुजी हाती घेण्यात आली आहे. मात्र, पावसामुळे खड्डय़ांमध्ये भरलेली बारीक खडी बाहेर येत असून ती रस्त्यांवर सगळीकडे पसरत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. मुळातच शहरभर पडलेल्या खड्डय़ांना प्रशासनच जबाबदार असून या सर्व प्रकारांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केल्याचे भाजयुमोचे प्रमोद कोंढरे यांनी सांगितले.
अलका चित्रपटगृहाजवळील टिळक चौकात तसेच परिसरात असलेल्या सुमारे पस्तीस ते चाळीस खड्डय़ांमध्ये झाडे लावून या वेळी निषेध करण्यात आला. पक्षाचे पदाधिकारी संजयमामा देशमुख, बापू नाईक यांची या वेळी भाषणे झाली. येत्या सात दिवसांत खड्डे न बुजल्यास अधिकाऱ्यांना घेराव आणि अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. कसबा युवा मोर्चाचे नामदेव माळवदे, दीपक पोटे, बाबू खैर, धनंजय पाटोळे, ओंकार केंगार, नीलेश पायगुडे, बंडू पवार आदी पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.