पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांना मंडप उभारण्यास व कार्यक्रम करण्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंदी केली असल्याने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वारकऱ्यांनी शुक्रवारी वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी एक तास थांबवून ठेवली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने हा विषय घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पालखी पुण्यात दाखल झाली.
माउलींच्या पालखीचा संगमवाडी येथे तिसरा विसावा असतो. या ठिकाणी एक तासाचा विसावा झाल्यानंतर चंद्रभागेतील वाळवंटात मंडप उभारण्याच्या प्रश्नावर शासनाने तोडगा न काढल्यास पालखी पुढे जाणार नाही, अशी भूमिका घेत वारकऱ्यांनी पालखी तेथेच थांबवून ठेवली. शासनाच्या वतीने जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी वारकऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी माउलीच्या पालखीचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार व इतर प्रतिनिधींची भेट घेतली व त्यांचे निवेदन स्वीकारले.
चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांचे खेळ ही परंपरा आहे. स्वच्छतेच्या बाबतीत वारकरी संस्था व दिंडय़ा सातत्याने विविध उपाययोजना करीत असतात. त्यामुळे बंदीच्या या प्रश्नावर शासनाने तोडगा काढावा. शासकीय पातळीवर त्यासाठी आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून द्यावा. त्या माध्यमातून चंद्रभागेच्या वाळवंटात मंडप उभारणी व कार्यक्रम करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी वारकऱ्यांनी मांडली. हा विषय १२ जुलैला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल, असे आश्वासन शासनाकडून देण्यात आल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली, अशी माहिती राजाभाऊ चोपदार यांनी दिली.