पिंपरी : मागील निवडणुकीत पुत्र पार्थ याचा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेला पराभव विसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळचे महायुतीचे उमेदवार बारणे यांच्या प्रचाराला सुरुवात केली. कोण पार्थ पवार? असा सवाल करणाऱ्या खासदार बारणे यांनीही बदलत्या भूमिकेनुसार मी उमेदवार म्हणून पार्थला प्रचाराला बोलविणार असून ते येतील, असा विश्वास व्यक्त केला.

खासदार बारणे म्हणाले, की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. अजित पवार यांनीही महायुतीसोबत येण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. महायुतीतील घटक पक्षाचे नेते म्हणून त्यांनीही माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणुकीत स्थित्यंतरे होत असतात. २०१४ च्या निवडणुकीत लक्ष्मण जगताप लढले होते. २०१९ च्या निवडणुकीत माझ्या प्रचारात होते. ही स्थित्यंतरे मनाला लावून घेऊ नयेत. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांचा मला पहिला फोन आला. सभा, बैठकीला येतो असे म्हटले होते. त्यानुसार ते मेळाव्याला आले. अजितदादा मोठ्या मनाचे नेते आहेत. माझ्या राजकारणाची सुरुवात महापालिकेतून झाली. मला काँग्रेसकडून अजितदादांनीच उमेदवारी दिली. आम्ही काँग्रेसमध्ये असताना एकत्र काम केले. मनामध्ये कटुता न ठेवणारा नेता अशी अजितदादांची ओळख आहे.

हेही वाचा – यंदा मुबलक साखर; आतापर्यंत झाले ‘एवढे’ उत्पादन

हेही वाचा – महायुतीच्या मेळाव्यात ‘मानापमान’ नाटय़; चंद्रकांत पाटील यांच्याकडून ‘नाराज’ कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना

मागीलवेळी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. ते प्रचाराला येतील का असे विचारले असता खासदार बारणे म्हणाले, की उमेदवार म्हणून प्रचारात सहभागी होण्यासाठी पार्थ पवार यांना सांगेन. येणाऱ्या काळात ते प्रचारात सहभागी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.