scorecardresearch

“दादा, मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा…”,अजित पवारांनी दिली बाळासाहेब थोरातांच्या फोनची माहिती

काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थोरातांबरोबर फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली.

Balasaheb Thorat Ajit Pawar Nana Patole
बाळासाहेब थोरात, नाना पटोले व अजित पवार (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गतचा संघर्ष चिघळला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थोरातांबरोबर फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला अशी बातमी मी माध्यमांमध्ये पाहिली. मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्यावेळी मी म्हटलो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं या शुभेच्छा. मात्र, एक बातमी आहे आणि त्याविषयी आज तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. कारण आज तुम्ही गडबडीत असाल.”

“दादा, मी राजीनामा दिलेला आहे”

“यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

हेही वाचा : “तुम्ही बाळासाहेब थोरातांना फोन करणार का?”, नाना पटोले म्हणाले, “आमचं त्यांच्याबरोबर…”

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

बाळासाहेब थोरात म्हणाले, “विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल.”

“गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा : बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

“महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणलं जात आहे, त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ,” असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:37 IST