लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महायुतीचे काम करत असून कार्यकर्ते थोडी गडबड करत आहेत. माझे बारकाईने लक्ष आहे. देश डोळ्यासमोर ठेवून एकदिलाने काम करायचे आहे. एकमेकांवर ढकला-ढकली करू नका. विरोधात काम करून गालबोट लागू देऊ नका, दगाफटका केल्यास सहन करणार नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ठणकावले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी माझे पाय धरून मी आशीर्वाद दिल्याचे सांगत समाजमाध्यमवर छायाचित्रे प्रसारित केली. त्यांची नौटंकी सुरू असून मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कोणाचेही ऐकत नाही, असेही ते म्हणाले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत येथे अजित पवार यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील शेळके, माजी आमदार बाळा भेगडे यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे सहकारी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा प्रचार करत असल्याचे दिसून येते. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, की मागीलवेळी एकमेकांविरोधात विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढलो आहोत. एकमेकांविरोधात लढलो आहोत. पण, आता ते सर्व विसरायचे आहे. विकास कामे करण्यासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचे काम करायचे आहे. काही गडबड करायची नाही. माझे बारकाईने लक्ष आहे. नात्यागोत्याची निवडणूक नाही. १३ मे पर्यंत नातीगोती बाजूला ठेवावीत. कोणी दगाफटका केल्यास मी सहन करणार नाही. मागील आठवड्यात मी पिंपरीत लग्नाला आलो. मी कधी येतो यावर लक्ष ठेवून वाघेरे बसले होते. मी आल्यानंतर आले आणि माझ्या पाया पडले. मी आशीर्वाद दिल्याचे सांगत समाजमाध्यमवर छायाचित्रे प्रसारित केली. ही नौटंकी असून याला काही अर्थ नाही. मी एकदा निर्णय घेतला की कोणाचेही ऐकत नाही. मी कधीही ‘मॅच फिक्सिंग’ केली नाही, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-बारामतीमध्ये कोण जिंकणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले उत्तर…

विरोधकांकडे कोणताच मुद्दा नाही. वाटेल ते बोलत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहिली. मात्र, काँग्रेसने त्यांचा पराभव केला. राज्य घटना बदलणार असल्याचे सांगून मागासवर्गीयांना अस्वस्थ करत आहेत, असा आरोप करत पवार म्हणाले, तळेगाव, चाकण, रांजणगाव एमआयडीसी वाढत आहे. विस्तार होत असून नवीन कारखाने येत आहेत. अडचणीमुळे काही कारखाने बंद पडत आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. चाकण, देहूपर्यंत मेट्रो नेल्याशिवाय वाहतूक कोंडी सुटणार नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये चोवीस तास पाणी देण्याचे नियोजन केले. मात्र, काही अडचणी आल्या. त्यातून माझ्यावर आरोप झाले. पवना धरणग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावला जाईल.

दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशाल?

दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशालीचे काम करणाऱ्यांचे चेहरे चार जूननंतर ओळखणार आहे. महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयात आमदार रोहित पवार देखील सहभागी होते. आता ते तत्व आणि निष्ठेची भाषा करत आहेत. बारामतीमधून आम्ही विजयाचा गुलाल उधळताना आम्ही तुमचेच होतो म्हणून सहभागी होऊ नका, असे खडेबोल आमदार शेळके यांनी रोहित पवार यांना सुनावले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar lashed out at ncp workers says will not tolerate violence pune print news ggy 03 mrj