‘‘शेवटचा निर्वाणीचा इशारा देतो, आता तरी सुधारा. ‘दिवसा एक-रात्री एक’ हे बंद करून पक्षाचे काम करा, नाहीतर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. विरोधात काम केल्यास पुन्हा माझ्याकडे यायचे नाही,’’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पुन्हा स्वपक्षीय कार्यकर्त्यांना तंबी दिली. त्याचप्रमाणे, काँग्रेस नेत्यांनीही आघाडी धर्म पाळायचा आहे, भविष्यात त्यांना पदे देताना आघाडीच्या उमेदवारासाठी केलेल्या कामाची माहिती घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादीतील मरगळ दूर करण्याबरोबरच मावळ मतदारसंघातील संभाव्य बंडाळी मोडून काढण्यासाठी अजितदादांनी मंगळवारी पिंपरी-चिंचवडमधील दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काळभोरनगर येथे बैठक घेतली. उमेदवार राहुल नार्वेकर, आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते विनोद नढे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यात आम्ही आघाडी धर्म पाळतो आहोत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आपल्यात समन्वय आहे. काही जण जाणीवपूर्वक आघाडीत संभ्रम निर्माण करत आहेत. काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी धर्माचे पालन केले पाहिजे, त्याची पडताळणी आम्ही करणार आहोत. भविष्यात पदे देताना एकमेकांकडून निवडणूक काळात केलेले काम प्रमाण मानले जाणार आहे. मावळमध्ये अजूनही काही जण प्रचारात सक्रिय झाले नाहीत. अजून सुधारा, कामाला लागा. निवडणुकीनंतर प्रत्येक वॉर्डचे मतदान तपासून पाहणार आहे, हे लक्षात ठेवा. काँग्रेसने देखील आघाडी धर्म पाळायचा आहे. त्यांच्याकडून विरोधात काम केल्यास त्याची माहिती मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना दिली जाणार आहे, अशी तंबी त्यांनी दिली. पैसे वाटपाकडे माझे लक्ष आहे, तुम्हीही लक्ष ठेवा, असे ते म्हणाले.