हवाई दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करून धमकावणाऱ्या आमदार विनायक निम्हण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना गुरुवारी दिले. याप्रकरणातील सर्व प्लॉटधारकांना शुक्रवारी (१२ जुलै) पोलीस ठाण्यामध्ये बोलाविण्यात आले आहे.
बाणेर येथील िवग कमांडर (निवृत्त) अरुण देशमुख यांना मारहाण करून त्यांना धमकावल्याच्या आरोपावरून विनायक निम्हण, त्यांचा मुलगा नगरसेवक सनी निम्हण यांच्यासह तिघांवर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, निम्हण यांनीही देशमुख यांच्याविरोधात त्यांच्या जागेत शिरुन कुंपण तोडल्याबद्दल तक्रार दिली होती. मात्र, याप्रकरणी कोणतीच दाद मिळत नसल्याने देशमुख यांच्या पत्नी अंजली देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेण्याचे ठरविले. मात्र, मुख्यमंत्री बैठकीमध्ये व्यग्र असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. यासंदर्भातील फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल करा, असे आदेश अजित पवार यांनी गुलाबराव पोळ यांना दिले. तर, ‘मी माहिती घेत असून पूर्ण माहिती अद्याप समजलेली नाही’, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.
 अंजली देशमुख म्हणाल्या, ‘‘विनायक निम्हण यांनी १९९२-९३ मध्ये प्लॉट पाडून विकले होते. त्यातील प्रत्येकाने बांधकाम करण्यापूर्वी तारेचे कम्पाउंड टाकले होते. निम्हण यांनी सगळ्यांचे तारेचे कम्पाऊंड काढले आणि कोण बांधकाम करतो त्याच्याकडे बघून घेतो अशी धमकी दिली. वस्तुत: या जनिमीची सरकारी मोजणी झाली आहे. बांधकामासाठी महापालिकेची परवानगी आहे. असे असताना निम्हण यांनी दादागिरी करून दोन्ही बाजूने भिंत बांधली आणि आमच्या रखवालदाराला हुसकावून लावत स्वत:चे रखवालदार आणून बसविले. त्यांच्या या ‘व्हाईट कॉलर’ गुंडगिरीविरोधात पोलीसदेखील आम्हाला दाद देत नसल्यामुळे शेवटी मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना निर्देश दिले असून आता शुक्रवारी आमची फिर्याद घेतली जाईल.’’