पुणे, पिंपरीतील पराभवाचा जबर धक्का?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीकडे असलेली दोन्ही शहरांमधील सत्ता भाजपने खेचून नेल्यामुळे त्याचा ‘कारभारी’ अजित ‘दादा’ पवार यांना जबर धक्का बसला आहे. त्यामुळेच की काय, निकाल लागल्यापासून ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. ‘दादा कुठे आहेत’, ‘ते कधी भेटतील,’ अशी चौकशी पक्षातील नेते, कार्यकर्ते करत आहेत. मात्र, कोणालाही त्यांचा थांगपत्ता लागत नाही. ते अज्ञातस्थळी (आऊट ऑफ स्टेशन) आहेत आणि काही दिवस कोणालाही भेटणार नाहीत, इतकेच उत्तर सर्वाना मिळत असल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे.

महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला पूर्ण पराभूत करून भाजपने बाजी मारली. पुण्यात १६२ पैकी ९८ तर पिंपरीतील १२८ पैकी ७७ जागा मिळवत भाजपने राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. अजित पवार हे दोन्ही शहरांचे ‘कारभारी’ होते. पुण्यातील सुमार कामगिरीमुळे तेथे सत्ता येईल की नाही, याविषयी त्यांच्याच मनात साशंकता होती. त्यामुळेच भाजपशी दोन हात करताना काँग्रेसशी आघाडी व्हावी, यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. तथापि, पिंपरीत आघाडी करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. कारण, पिंपरीत राष्ट्रवादी सुस्थितीत होती. विकासाच्या मुद्यावर मतदारांचा कौल मिळेल आणि िपपरी-चिंचवडला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळेल, किंबहुना १०० पर्यंत संख्याबळ जाईल, असेच अजित पवारांना वाटत होते. पक्षातील स्थानिक नेते तसे जाहीरपणे सांगतही होते. मात्र, अजित पवारांचा भ्रमनिरास झाला आणि दोन्हीकडे सत्तांतर झाले.

पिंपरी पालिकेत २००२ पासून राष्ट्रवादीची सत्ता होती आणि सर्व सूत्रे अजित पवारांच्या हातात होती. सन २००७ व २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमत मिळाले. ‘राष्ट्रवादी म्हणेल तीच पूर्व दिशा’ असे चित्र शहरात होते. त्याचा मोठा गैरफायदा घेत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पिंपरी पालिकेची ‘खाऊगल्ली’ केली. त्यामुळे विकासाचा मुद्दा मागे पडून त्यांच्या भ्रष्ट कारभाराची लक्तरे चव्हाटय़ावर आली, त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. पिंपरीत ९२ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीच्या वाटय़ाला केवळ ३६ सदस्य आले. पुण्यातही जेमतेम ३८ नगरसेवकांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. हा निकाल गेल्या आठवडय़ात लागला, तेव्हापासून अजित पवार कोणालाही भेटायला तयार नाहीत. पक्षाचे कार्यकर्ते त्यांना भेटू इच्छित आहेत, मात्र ते उपलब्ध होत नाहीत. ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. काही दिवस ते ‘आऊट ऑफ स्टेशन’ आहेत तोपर्यंत ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या वर्तुळातून देण्यात आली.

पिंपरीतील पराभवानंतर पक्षपातळीवर स्थानिक नेत्यांनी गेल्या शनिवारी बैठक घेऊन मुक्तचिंतन केले. सत्तेचा दुरूपयोग करून भाजपने निवडणूकजिंकली, असा आरोप या बैठकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला. प्रभागनिहाय बैठका घेऊन पराभवाची नेमकी कारणे शोधून काढण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. मात्र या बैठकीत अजितदादांनी मार्गदर्शन करावे अशी सर्वाची अपेक्षा होती. पिंपरीतील कोणताही निर्णय दादांना विचारल्याशिवाय घ्यायचा नाही, असा प्रघात असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याची भावना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.