काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राला दुष्काळानं प्रचंड ग्रासलं असताना त्रस्त झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘आता धरणात मुतायचं का?’, असे उद्गार काढून रोष ओढवून घेतला होता. त्यानंतर आता या प्रसंगाची आठवण करुन देत अजित पवारांनी मी बोलताना दहा वेळेस विचार करून बोलतो असे म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
“मी बोलताना दहा वेळेस विचार करून बोलतो. पाठीमागे एकदा चुकलो तेव्हा सकाळी सात ते रात्री सात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी बसलो आता नाही चुकायच, आता नाही चुकायच अस म्हणत बसलो होतो. तेव्हापासून चुकलो नाही. कितीही टाळ्या वाजवा, खूश करा तरी ही मी घसरणार नाही. बोलताना टाळ्या पडायला लागल्या की हळू हळू घसरायला लागतो. पण मी माझ्या दुसऱ्या मनाला सांगतो घसरायचं नाही,” असे अजित पवार म्हणाले.
यावेळी बोलताना अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील पाण्याच्या समस्येबाबतही भाष्य केले. “मी तुम्हाला शब्द देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या नाही तुम्हाला रोज पाणी प्यायला दिले तर नाव अजित पवार सांगणार नाही. मी काही जादूची कांडी फिरवणार नाही. तुम्हाला २६७ एमएलडी पाणी दोन धरणांमधून देण्यात आले आहे ते पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत,” असेही अजित पवार म्हणाले.