टेकडय़ांवर बांधकाम परवानगी देण्यासंबंधीचा वाद निर्माण करून शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांना लक्ष्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खडसावले असून बीडीपीसंबंधीचा जाहीर वाद थांबला पाहिजे, त्याबाबत आता ब्र सुद्धा उच्चारू नका, अशा शब्दात दादांनी बीडीपी समर्थक नगरसेवकांना झापल्याची चर्चा आहे.
समाविष्ट तेवीस गावांमधील टेकडय़ांवर बांधकामाला परवानगी न देण्याचा आणि जागामालकांना त्या मोबदल्यात आठ टक्के ग्रीन टीडीआर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासंबंधीची सर्व कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवकांनी टेकडय़ांवर दहा टक्के बांधकाम परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मुख्य सभेला दिला आहे. या प्रस्तावाचे निमित्त करून शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनाच लक्ष्य करण्याचा आणि त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे नगरसेवक करत आहेत. हा प्रस्ताव देण्यावरच हे नगरसेवक थांबलेले नाहीत, तर काही जणांनी शहराध्यक्षांच्या विरोधात पत्रकेही काढली आहेत.
पुण्यातील या घडामोडींची गंभीर दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याचे आता दिसत आहे. बीडीपी समर्थक आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधात मोहीम सुरू केलेल्या नगरसेवकांपैकी काही जणांना अजितदादांनी गुरुवारी सकाळीच वैयक्तिकरीत्या फोन केले आणि त्यांना फैलावर घेतले. तुमच्या या वादामुळे पक्षाची बदनामी होत आहे. आता हा वाद वाढवू नका. बीडीपीबद्दल आता कोणी ब्र उच्चारलेलाही मला चालणार नाही. एकमेकांवर फक्त चिखलफेक सुरू असल्यामुळे लोकांपर्यंत वाईट संदेश जातो. बीडीपीबद्दल तुमचे जे काही म्हणणे असेल त्याचा विचार पक्ष करेल आणि पक्षच त्याबाबत अंतिम निर्णय घेईल. तोपर्यंत तुम्ही कोणीही या वादाबाबत आता काहीही बोललेले चालणार नाही, असे दादांनी प्रत्येकाला सांगितल्याचे समजते.