राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अजित पवारांच्या या स्वभावाचा प्रत्यय पुण्यातील एका सभेत पुन्हा आला. पुणे शहर कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी सरकार असताना गृहमंत्री पद मागितले होते. मात्र, वरिष्ठांनी आपल्याला गृहमंत्री पद दिले नाही, अशी खंत बोलून दाखवली.

हेही वाचा – Vedanta Foxconn : सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही – रोहित पवार

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

पुण्यात झालेल्या शहर कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना एका पदाधिकाऱ्याने त्यांना राज्यात सरकार येताच गृहमंत्री बनण्याची विनंती केली. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, “मला उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर मी वरिष्ठांकडे गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांना गृहमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर मी पुन्हा मागणी केली. तेंव्हाही दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आहे. कदाचित वरिष्ठांना वाटत असेल की याला गृहमंत्री बनवले तर हा आपलंही ऐकणार नाही, त्यामुळे मला गृहखातं दिलं नसेल”, अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात जोरात हशा पिकला.

हेही वाचा – मॉलमधील वाईनविक्रीवरून अण्णा हजारेंनी व्यक्त केला संताप; म्हणाले, “जर या सरकारने…”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मला जे योग्य वाटत, तेच मी करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जरी चुकला तरी त्याला माफी नाही. माझ्याकडे सर्वांसाठी सारखा नियम आहे. एखादा कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल. मात्र, तोच जर चुकत असेल तर त्याला पाठिशी घालण्यात अर्थ नाही.”

पदाधिकऱ्यांची आढावा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहरातील हडपसर, वडगावशेरी,पर्वती आणि पुणे कँटोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकऱ्यांची आढावा बैठक आज नेहरू मेमोरियल हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.