पिंपरी महापालिकेच्या वतीने गरोगरीब नागरिकांसाठी राबवण्यात येणारा घरकुल प्रकल्प अध्र्यातून गुंडाळून लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला आहे. बँकेकडून अडवणूक करण्याच्या प्रकारामुळे नागरिक हतबल झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कष्टकरी कामगार पंचायत, आम आदमी पार्टी, भाजप-शिवसेना, रिपाई यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या वतीने घरकुल धारकांच्या विविध प्रश्नांसाठी पिंपरी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाबा कांबळे, मारुती भापकर, एकनाथ पवार, राहुल जाधव, सारंग कामतेकर, सीमा सावळे, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत, अजीज शेख, प्रल्हाद कांबळे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा महापालिकेजवळ आला. यावेळी पालिकेत आयुक्त नव्हते. त्यामुळे शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांची भेट घेतली. ते नव्याने रुजू झाले असल्याने त्यांनीच आंदोलकांकडून घरकुलची माहिती घेतली.
या संदर्भात बाबा कांबळे म्हणाले, घरकुल प्रकल्प अध्र्यातून गुंडाळणे ही लाभार्थ्यांची फसवणूक आहे. चिखलीत साडेसहा हजार घरे होणार आहेत, असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात तेथे चार हजारच घरे होतील, अशा हालचाली आहेत. घरे न मिळणाऱ्या नागरिकांना अन्य प्रकल्पात सामावून घेऊ, असे आता सांगितले जात आहे. त्याविषयी ठामपणे बोलले जात नाही. अन्य कामांसाठी प्राधिकरणाकडून जागा घेतली जाते. मग, घरकुलसाठी त्यांच्याकडून भूखंड घेण्यास हरकत नसावी. बँकेकडून लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. सर्व बाजूने लाभार्थ्यांच्या अडचणी वाढत आहेत. घरकुलचा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका सर्वानी घेतली आहे, असे ते म्हणाले.