पिंपरी : शहरातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या सर्व निवासी मिळकतींना मिळकतकरात १०० टक्के माफी देण्याचा निर्णय पिंपरी पालिकेने घेतला आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या निवासी बांधकामांना आकारण्यात येणारा शास्तीकरही पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. पिंपरी पालिकेने जरी यावर शिक्कामोर्तब केले असले तरी, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात येणार आहे.

पिंपरी पालिका सभेत पीएमपीच्या आगारासाठी जागा देण्याच्या विषयाला उपसूचना म्हणून सत्तारूढ भाजपने हे दोन्हीही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आणि गोंधळातच मंजूर केले. त्यानुसार, महापालिका हद्दीतील सध्या अस्तित्वात असलेल्या आणि यापुढे नव्याने आकारणी होणाऱ्या ५०० चौरस फुटापर्यंतच्या सर्व निवासी मिळकतींना एक एप्रिल २०२० पासून मिळकतकरांच्या बिलामध्ये १०० टक्के माफी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालिका हद्दीतील सर्व निवासी बांधकामांना शास्तीकर १०० टक्के माफ करण्यास सभेने मान्यता दिली आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने ही माफी देण्यात येईल. यापूर्वी, एक हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना शास्तीकर आकारण्यात येत नव्हता. मात्र, एक हजार ते दोन हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकांना मालमत्ता कराच्या ५० टक्के शास्तीकर आकारण्यात येत होता. तर, दोन हजार चौरस फुटापुढील निवासी बांधकामांना प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्तीकर आकारण्यात येत होता.

नव्या निर्णयानुसार, सर्व प्रकारच्या निवासी बांधकामांना शास्तीकर १०० टक्के माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या दोन्हीही विषयांना शासनाची मान्यता मिळणे आवश्यक आहे.