पिंपरी : करोनाविषयक नियम पाळावेत, यासाठी सतत आग्रही असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मावळ दौऱ्यात करोनाच्या जवळपास सर्व नियमांना त्यांच्यासमोरच तिलांजली देण्यात आली. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या वडगाव मावळातील जाहीर सभेत बोलताना त्यांनी गेल्या साडेसात वर्षांत अच्छे दिन आलेच नाहीत, असे सांगत केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी अजित पवार यांचा लोणावळा ते वडगाव असा एकदिवसीय दौरा होता. जवळपास ३०० कोटींच्या विविध विकासकामांचा प्रारंभ पवारांच्या हस्ते झाला. या निमित्ताने आमदार शेळके यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. जवळपास प्रत्येक  कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. सायंकाळी वडगावात झालेल्या जाहीर सभेत तर हजारोंची  उपस्थिती होती. मुखपट्टी घाला, सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना पवार वारंवार देत होते. मात्र, गर्दीत कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. व्यासपीठावरही बरीच गर्दी झाली होती. भाषण करताना मुखपट्टी काढा, अशी विनंती  आमदार शेळके यांनी अजितदादांना केली. वाढदिवस असल्याने त्यांचा मान राखून पवारांनी मुखपट्टीशिवाय प्रथमच भाषण केले.

आमदार निधीत आणखी वाढ

केंद्र सरकारने खासदारांचा निधी रद्द केला. राज्य सरकारने मात्र आमदारांचा निधी ४ कोटींपर्यंत वाढवला आहे. नागरिकांची कामे करण्यासाठी आमदारांना अधिकचा निधी आवश्यक आहे. त्यामुळे आमदार निधी आणखी वाढवण्याची गरज आहे. तसा तो मी वाढवणार असल्याचे अजित पवार यांनी सभेत सांगितले.