मोबाइलपेक्षा वाचनाला प्राधान्य दिले जावे, मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने अंबोजोगाईतील अभिजित जोंधळे दहा वर्षांपासून पुस्तकपेटी हा उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहित करण्यासाठी ‘श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार’ त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त श्रीराम ओक यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद…
पुस्तकपेटी उपक्रमामागील प्रेरणा कोणती?
- वाचक पुस्तकांचा शोध घेत येण्यापेक्षा आपणच वाचकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मित्रमंडळींच्या सहकार्याने हे काम सुरू होते. गेल्या वीस वर्षांपासून अंबाजोगाईतील अनुराग पुस्तकालयाच्या माध्यमातून वाचकवृद्धीसाठी विविध प्रयत्न सुरू होते. ‘शब्दोत्सव’ हा दिवाळी अंक आम्ही प्रकाशित करतो. त्यातील एका सदराच्या निमित्ताने २०१४ मध्ये नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे विनायक रानडे यांची मुलाखत घेतली होती. ते पुस्तक पेटी उपक्रम राबवतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अंबाजोगाईत काही करता येईल का म्हणून प्रयत्न केले आणि हा उपक्रम दहा वर्षांपूर्वी सुरू झाला.
उपक्रमाला सुरुवात नेमकी कशी झाली?
- शाळांमध्ये ग्रंथालये आहेत, पण तेथे मुलांना वाचायला आवडतील अशी पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. त्यासाठी अंबाजोगाईतील आमच्या मैत्री गटात चर्चा केली. त्यातून बालसाहित्यातील काही गाजलेल्या पुस्तकांची निवड केली. पेटीत काय असावे, असा विचार करताना चरित्र, कथा-कविता, विज्ञान अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांबरोबरच ओरिगामी अथवा विनोदी पुस्तक द्यायचे आम्ही ठरवले. सुरुवातीला शाळांमधील इयत्तांचा विचार करून बालवाडी ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी असे गट तयार केले आणि वयोमानानुसार पहिली पुस्तकपेटी तयार केली. पहिली पुस्तकपेटी देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधले आणि ३ जानेवारी २०१५ रोजी पहिली पुस्तकपेटी अंबाजोगाईपासून दहा-बारा किलोमीटरवरील कुंबेफळ गावातील जयप्रभा माध्यमिक शाळेत दिली. दर वर्षी ही पेटी देत असताना बाजारात येणारी नवनवीन पुस्तके चाळून मुलांना उपयुक्त आहेत का हे पाहून, तसेच बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या सल्ल्याने ही पुस्तके घेतली जातात.
पुस्तकपेटीत किती पुस्तके असतात?
- पुस्तके शाळांमध्ये पाठवताना सर्वांत आधी शाळांची निवड करणे गरजेचे होते. ज्या शाळेत मुलांकडून वाचून घेण्याची इच्छा असणारा शिक्षक असेल, तेथेच ही पेटी पाठविण्याची आमची अट होती आणि त्यानुसार शाळा निवड करित हा उपक्रम सुरू केला. आम्ही शिक्षकांशी चर्चा करून शाळेतील वाचनाचा दर्जा जाणून घेतो आणि त्यानुसार कोणत्या गटाची पेटी द्यायची हे ठरवतो आणि पुस्तकपेटी देतो. बालवाडी ते चौथी या वयोगटासाठी तयार केल्या जाणाऱ्या पेटीत साधारणपणे नव्वद ते शंभर पुस्तके, तर माध्यमिक शाळेसाठी दिल्या जाणाऱ्या पेटीत सत्तरेक पुस्तके असतात.
या पेटीतील पुस्तकांची विभागणी कशी केलेली असते?
- लहान वयोगटासाठी ठळक, मोठ्या अक्षरातील रंगीत पुस्तके आम्ही देतो. चित्रमय पुस्तके या गटात अधिक वाचली जातात. केवळ मुलांसाठीच नाही, तर शिक्षकांसाठीही या पेटीत आम्ही किमान पाच पुस्तके देतो. त्यात काही अनुवादित असतात. शिक्षकांना दुचाकीवर सहज पुढे ठेवून नेता येईल, असा एक प्लास्टिकचा बॉक्स असतो. त्यात ही पुस्तके असतात. ही एक पेटी एका शाळेकडे एका सत्रासाठी अथवा सहा महिन्यांसाठी ठेवली जाते. या काळात पहिल्या शाळेतील मुलांनी वाचून झालेली पुस्तके पेटीसह दुसऱ्या शाळेत पाठवली जातात आणि पहिल्या शाळेला दुसरी पेटी दिली जाते. सुरुवातीला आम्ही एका शाळेत वर्षभरासाठी दोन-तीनच पेट्या पाठवू शकलो, पण मग नंतर प्रायोजक वाढत गेल्यामुळे आम्ही ही संख्या पाच-सहा पेट्यांवर नेऊ शकलो. त्यामुळे अधिकाधिक पुस्तके मुलांना आणि शिक्षकांना वाचायला मिळाली. पुस्तकपेटीचा सुयोग्य वापर होतो अथवा नाही, हे पाहण्यासाठी मैत्री गटाचे सदस्य दोन-तीन महिन्यांतून एकदा शाळेला भेट देतात. पुस्तकपेटीची काळजी घेण्यासाठी पेटीप्रमुख म्हणून एखाद्या विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीची निवडही केलेली असते. याशिवाय अंबाजोगाईपासून ५० किलोमीटरबाहेरच्या शाळेची जबाबदारी शिक्षकाकडे दिली जाते. त्याला ग्रंथमित्र संबोधले जाते. असे शिक्षक, विद्यार्थी आणि मित्र परिवाराच्या मदतीमुळे या उपक्रमाचा फायदा अधिकाधिक शाळांना होतो आहे.
shriram.oak@expressindia.com