‘‘महाविद्यालयात शिकत असताना आम्ही विद्यार्थ्यांनी बिहारमधील दुष्काळग्रस्तांसाठी निधी जमवण्याच्या उद्देशाने एका प्रसिद्ध कलाकाराचा कार्यक्रम करायचे ठरवले. दारूच्या आहारी गेलेल्या त्या कलाकाराने आम्हाला इतके प्रभावित केले की आम्हीही त्या ४-५ दिवसांत त्याच्याबरोबर दारू पिऊ लागलो होतो. दारू पिऊन झाल्यावर मी जेवायला गेलो आणि तिथे माझा तोलच गेला. गडबडीने स्वत:ला सावरताना आपले वागणे चुकीच्या दिशेने चालले आहे या जाणिवेने डोळे खाडकन् उघडले. गेलेल्या तोलामुळेच मी सावरू शकलो!..’’ ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट सांगत होते.
‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘व्यसन आणि आपण’ या विषयावर अवचट यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर, संस्थेचे पुणे शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी या वेळी उपस्थित होते. अवचट म्हणाले, ‘‘पूर्वी कामगार वर्गात दारू लोकप्रिय होती. पण आता ती मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गातही तितकीच लोकप्रिय आहे. मध्यमवर्ग जेव्हा एखाद्या गोष्टीचा स्वीकार करतो तेव्हा तिला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि व्यसनाला ज्या शहाणपणाने नकार द्यायचा असतो ते शहाणपण विसरले जाते. अधूनमधून पिणारा ‘सोशल ड्रिंकर’ आणि दारूचा व्यसनी यातील सीमारेषा पुसट आहेत. मुक्तांगण संस्थेतील आमच्या अनुभवानुसार दर पाच ‘सोशल ड्रिंकर्स’मधील एक दारूचा व्यसनी बनतो. आनंद मिळवण्याचे पर्याय अनेक आहेत. ज्या आनंदासाठी किंमत मोजावी लागते त्यापासून दूरच राहावे.’’
सातत्याने अस्वच्छ वातावरणात काम करावे लागणाऱ्या कामगारांमधील व्यसनांचे प्रश्न मुक्ता मनोहर यांनी मांडले. त्या म्हणाल्या, ‘‘बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावण्याचे काम करणारे लोक, कचरा डेपोतील कामगार यापैकी अनेक  जणघाणीचा दर्प सहन करण्यासाठी व्यसनाला बळी पडलेले दिसतात. ही परिस्थिती भयंकर आहे. या कामगारांच्या नव्या पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवण्यासाठी मूलभूत समस्येवर उपाय शोधण्याची गरज आहे.’’