शहराच्या उपनगरातील नाटय़रसिकांसाठी दोन नव्या नाटय़गृहांची भर पडली असली तरी महापालिका प्रशासनाने अद्याप नाटय़गृहांचे सांस्कृतिक केंद्र विभागाकडे हस्तांतरण केलेले नाही. त्यामुळे नव्या नाटय़गृहांमध्ये प्रत्यक्ष नाटय़प्रयोग किमान महिन्याभराने होऊ शकेल.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे वानवडी येथील महात्मा फुले सभागृह आणि बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या दोन नव्या नाटय़गृहांचे घाईगडबडीमध्ये उद्घाटन करण्यात आले. महात्मा फुले सभागृहामध्ये ८१५ आसनक्षमतेचे तर, अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये ८५० आसनक्षमतेचे नाटय़गृह साकारण्यात आले आहे. या दोन्ही नाटय़गृहांची किरकोळ कामे करावयाची शिल्लक आहेत. या कामांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका भवन विभागाकडून या नाटय़गृहांचे सांस्कृतिक केंद्रे विभागाकडे हस्तांतरण झालेले नाही. या तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यामध्ये किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे नव्या नाटय़गृहांमध्ये १ एप्रिल या नव्या आर्थिक वर्षांपासून नाटकाचे प्रयोग होऊ शकतील अशी माहिती पुढे आली आहे.
या दोन्ही नाटय़गृहांसाठी मिळून किमान ६० जणांचा कर्मचारी वर्ग आवश्यक आहे. प्रत्येक नाटय़गृहामध्ये तीन पाळ्यांमध्ये मिळून १५ सफाई कर्मचारी आणि १० सुरक्षारक्षक नियुक्त करावे लागतील. त्याचप्रमाणे ज्युनिअर क्लार्क, रिलिव्हर आणि सहायक व्यवस्थापक अशी नाटय़गृहामध्ये काम करण्यासाठी प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागणार आहे. या पदांना प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल. या नाटय़गृहांच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षारक्षकांचा ठेका अद्याप दिलेला नाही. नाटय़गृहांसाठी भाडे आकारणी निश्चित झालेली नाही. या सर्व बाबींची पूर्तता झाल्यावरच येथे नाटकांचे प्रयोग होऊ शकतील, अशी माहिती रंगमंदिरे मुख्य व्यवस्थापक भारत कुमावत यांनी दिली. या दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरी नाटय़गृहांमध्ये प्रयोग सुरू करण्यामध्ये कोणताही अडसर येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.