जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये या मुद्दय़ाचा अंतर्भाव करावा, अशी विनंती करण्यात येणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र हे जादूटोणाविरोधी कायदा संमत करणारे देशातील एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राचा कित्ता गिरवीत केंद्रीय पातळीवर हा कायदा लागू करावा ही समितीची मागणी आहे. त्याचप्रमाणे विविध राज्य सरकारांनी हे विधेयक संमत करण्याची आवश्यकता आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असलेला फलज्योतिष हा अभ्यासक्रम असू नये, अशी मागणी अविनाश पाटील यांनी केली.  हा अभ्यासक्रम म्हणजे घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, फलज्योतिषराष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये डॉ. मुरलीमनोहर जोशी मानव संसाधनमंत्री असताना वैदिक गणित आणि ज्योतिर्विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला होता. महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला असला, तरी देशभरातील ४० विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. त्याला विरोध करीत आंध्र प्रदेशातील शास्त्रज्ञांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, अभ्यासक्रमाची रचना हा यूजीसीच्या अखत्यारितील विषय असून या संदर्भात त्यांच्याकडेच जावे लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti superstition bill astrology national level
First published on: 01-03-2014 at 03:00 IST