पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी येथे महामार्गाच्या जागेत बेकायदेशीरपणे शोरुमचे बांधकाम केल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्य़ात किसन राठोड याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश विनय जोशी यांनी शनिवारी फेटाळला.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने राठोड याच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्य़ात अटक टाळण्यासाठी राठोडने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, राठोडवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यातील पाच गुन्ह्य़ात तो फरार आहे. या गुन्ह्य़ांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी फरगडे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने राठोडचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळला. शिंदेवाडी येथे ६ जून रोजी झालेल्या पावसानंतर रस्त्यावर प्रचंड पाणी वाहून माय-लेकींचा मृत्यू झाला होता.