पिंपरी : निगडी, प्राधिकरण येथील एका व्यावसायिकाच्या घरी शनिवारी रात्री दरोडा पडला. तोंड बांधून आलेल्या आरोपींनी व्यावसायिकासह काळजीवाहकाचे हात, पाय, तोंड बांधून पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकला. त्यामध्ये सहा लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी व्यावसायिकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उद्योजक आहेत. शनिवारी रात्री ते घरात दूरचित्रवाणी पाहत बसले होते. काळजीवाहक महिलेने त्यांना जेवण वाढले आणि ती तिच्या खोलीत गेली. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. त्यानंतर चार ते पाच दरोडेखोर मुख्य दरवाजातून घरात आले. त्यांनी व्यावसायिकाला पिस्तुल दाखवले आणि तिजोरी कुठे आहे, असे विचारले. त्यानंतर त्यांचे हात, पाय बांधून तोंडावर चिकटपट्टी लावली.
दरोडेखोरांनी घरातील सर्व खोल्यांमधील साहित्य अस्ताव्यस्त केले. यामध्ये दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ८० हजार रुपये किमतीची सोन्याची रिंग व नथ, ८० हजार रुपये किमतीची चांदीची एक किलो वजनाची वीट, ८० हजार रुपये किमतीची एक किलो वजनाची चांदीची भांडी, एक लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, १० हजार रुपये किमतीचे घड्याळ, पाच हजार रुपये रोख रक्कम, दोन आधार कार्ड, मोटारीची कागदपत्रे असा एकूण सहा लाख १५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. निगडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले.
काळजीवाहक कुटुंबाला कोंडले
दरम्यान, दरोडेखोरांनी व्यावसायिकाच्या काळजीवाहक, त्यांचे पती आणि त्यांच्या दोन मुलांना बंगल्याच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खोलीत हात, पाय आणि तोंडाला चिकटपट्टी बांधून कोंडले. त्यांनाही पिस्तुलाचा धाक दाखवला. पोलीस आल्यानंतर या कुटुंबाची सुटका करण्यात आली.
चौकट
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
व्यावसायिकाचा बंगला स्वामी विवेकानंद चौकात आहे. या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चौकाच्या दोन्ही बाजूला असलेल्या लाल बंगला चौक आणि हुतात्मा चौकात स्मार्ट सिटीचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र दोन्ही ठिकाणचे कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासात मोठा अडथळा येत आहे.