मिळकत कराची थकबाकी असलेल्यांच्या घरापुढे वसुलीसाठी बँड वाजवण्याचा उपक्रम महापालिकेने सुरू केल्यानंतर पीएमपीकडून असलेली लाखो रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँड वादनाचा उपक्रम सुरू केला आहे. पीएमपीच्या मुख्य कार्यालयासमोर ‘थकबाकी भरा’ अशी मागणी करत मनसेने आज बँड वादन केले.
महापालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकीदारांच्या मिळकतीसमोर बँड वादन करून थकबाकी वसुलीचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे मोठय़ा प्रमाणात थकबाकी वसुली होत आहे. अशाच पद्धतीने पीएमपीकडूनही वसुली केली जावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
या मागणीसाठी पीएमपीच्या मुख्य कार्यालयासमोर बुधवारी विरोधी पक्षनेता वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पीएमपीने महापालिकेचा ५७ लाख रुपयांचा मिळकत कर थकवला आहे. या थकबाकीसंबंधीची नोटीसही महापालिकेने पीएमपीला नोव्हेंबर २०१२ मध्ये दिली होती. मात्र, पीएमपीने ही थकीत रक्कम अद्यापही भरलेली नाही. जकात बंद झाल्यामुळे महापालिकेने मिळकत कर वसुलीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.
मनसेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते या वेळी पीएमपीसमोर ठाण मांडून बसले होते. तसेच ‘मिळकत कराची थकबाकी भरा’ अशा घोषणा देत पीएमपी कार्यालयासमोर बँडही वाजवण्यात आला. महापालिकेने केलेली कराची मागणी नियमानुसार देय आहे आणि ती रद्द करता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केलेले असूनही पीएमपी ही थकबाकी भरत नाही. ती त्यांनी तातडीने न भरल्यास पीएमपी संचालकांच्या घरासमोर बँड वादन केले जाईल, असाही इशारा मनसेने दिला आहे.