पुणे : करोना काळातील उपचारांमध्ये वापरण्यात आलेल्या स्टिरॉईड्समुळे करोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या सांधेरोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सांध्यांशी संबंधित कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, लहानशा दुखापतीनंतरही हाडांचा चुरा होणे अशा तक्रारी प्रामुख्याने दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. या दुखण्याला अव्हास्क्यूलर नेक्रॉसिस (एव्हीएन) किंवा ‘बोन डेथ’ असे म्हटले जाते. करोनातून बरे झाल्यानंतर उद्भवलेल्या सांधेदुखीवर वेळीच उपचार न घेतलेल्या रुग्णांमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत आहे. करोना संसर्ग होऊन गेल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये दीर्घकाळापर्यंत जे त्रास दिसून येतात त्यांमध्ये प्रामुख्याने हा आजार दिसून येत आहे. स्टिरॉईड औषधांच्या उपचारांनंतर तब्बल सहा महिने ते एक वर्षांच्या काळात ही लक्षणे दिसत असल्याचे ‘बीएमजे’ या वैद्यकीय नियतकालिकाने नमूद केले आहे. लोकमान्य रुग्णालयाचे सांधेरोपण शल्यविशारद डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले,की करोनाचा संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांच्या उपचारांदरम्यान स्टिरॉईडचा वापर लक्षणीय आहे, अशा काही रुग्णांमध्ये खुब्याच्या सांध्यांमध्ये वेदना होत असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांची तपासणी केला असता अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजेच खुब्याच्या सांध्यातील मांडीच्या हाडातील बॉलला रक्तपुरवठा सुरळीत होत नसल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच वेळा करोनानंतर आलेल्या अशक्तपणामुळे काही काळ याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अस्थिरोगतज्ज्ञांकडे येण्यास रुग्ण उशीर करतात. मात्र, चालताना होणाऱ्या वेदना, लंगडणे, पायाची लांबी कमी होणे यांपैकी कोणती लक्षणे दिसल्यास फॅमिली डॉक्टर त्यांना अस्थिरोगतज्ज्ञांकडे पाठवतात. वैद्यकीय तपासण्या, क्ष-किरण, एमआरआय केल्यानंतर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे निदान होत असल्याचे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले. या आजाराचे प्रामुख्याने चार टप्पे दिसतात. आजार तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असल्यास सांधा प्रत्यारोपणाची गरज भासते. आजार पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असल्यास फिजिओथेरपीसारख्या पर्यायाने किंवा इतर लहानशा शस्त्रक्रियेने रुग्ण बरा होतो. लोकमान्य रुग्णालयाच्या एका अभ्यासात करोनातून बरे झालेल्या ६० रुग्णांना खुब्याच्या वेदना आढळल्या आहेत. त्यांपैकी ३७ रुग्णांना दुसऱ्या टप्प्यात, तर २३ रुग्णांमध्ये आजार तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात असल्याने सांधेरोपण करावे लागल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.