सर्जनशील लेखक, साक्षेपी संपादक हरपला

पुणे : सर्जनशील लेखक, साक्षेपी संपादक आणि दूरदृष्टी असलेले प्रकाशक अशा त्रिवेणी व्यक्तिमत्त्वाने साहित्य क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित करणारे ‘पद्मागंधा प्रकाशन’चे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे (वय ६६) यांचे रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

मेहता पब्लिंशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर जाखडे यांच्या आकस्मिक निधनाने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मेहता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (१५ जानेवारी) झालेल्या सभेत जाखडे यांनी मनोगत व्यक्त केले होते. त्यानंतर रविवारी सकाळी जाखडे यांच्या निधनाचे वृत्त आले. झोपेत असतानाच पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रकाशन व्यवसायात अरुण जाखडे यांचे बहुमूल्य योगदान आहे. नगरमधील आष्टीसारख्या निसर्गरम्य ग्रामीण भागात त्यांचे बालपण गेले. तेथील वातावरणाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. निसर्गासह माणसे, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या तेथील अनुभवविश्वाचे प्रर्तिंबब ‘लोकसत्ता’तील त्यांच्या ‘इर्जिक’ या स्तंभलेखनात उमटले होते.

विशेष प्रकल्पाचे नियोजन करून काम करणे या कार्यपद्धतीमुळे जाखडे यांनी पद्मागंधा प्रकाशनच्या माध्यमातून वाङ्मयीनविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डॉ. रा. चिं. ढेरे लिखित ‘श्री तुळजाभवानी’ हा ग्रंथ तसेच रघुनाथ धोंडो कर्वे या विसाव्या शतकातील विचारावंतांचे विचारधन हा आठ खंडांतील प्रकल्प त्यांनी प्रकाशित केला. ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’, ‘पाचरुट’, ‘पावसाचे विज्ञान’,‘प्रयोगशाळेत काम कसे करावे’, ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’, ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’, ‘विश्वरूपी रबर’, ‘शोधवेडाच्या कथा’ असे विपुल साहित्य त्यांनी प्रकशित

केले.

खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मागंधातर्फे प्रकाशित करण्यात आला होता. याशिवाय बालवाङ्मय, विज्ञान, इतिहास अशा विविध विषयांवर त्यांनी पुस्तके प्रकाशित केली. दिल्लीच्या फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स संस्थेतर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे सहा पुरस्कार तसेच राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी दिला जाणारा श्री. पु. भागवत पुरस्कार अशा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी जाखडे यांना गौरविण्यात आले होते.

उल्लेखनीय ग्रंथनिर्मिती

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, सर्जक आणि संगोपक अशी श्री तुळजाभवानी मातेच्या मिथकाची प्रेरकता उलगडणारा डॉ. रा. चिं. ढेरे लिखित ‘श्री तुळजाभवानी’ हा ग्रंथ आणि

र. धों. कर्वे या विसाव्या शतकातील विचारावंतांचे विचारधन हा अष्टखंडात्मक प्रकल्प, त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारताचा स्वातंत्र्यलढा, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण ही जाखडे यांनी प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा लक्षणीय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.