अमेरिकेच्या सहकार्याने भारतामध्ये अणुप्रकल्प उभाण्यात येणार असून, त्याल एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्स पतपुरवठा करणार आहे. याबाबत ‘न्युक्लेर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया’शी (एनपीसीआयएल) बोलणी झाली असून, त्या दृष्टीने वाटाघाटी सुरू आहेत, अशी माहिती एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष फ्रेड हॉक्बर्ग यांनी दिली.
इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचा वतीने आयोजित चर्चासत्रात हॉक्बर्ग यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. चेंबरचे पुण्याचे अध्यक्ष शालेंद्र पोरवाल, युनायटेड स्टेट्स कमर्शियल सव्‍‌र्हिसचे वाणिज्य अधिकारी मार्टिन क्लेन्सन या वेळी उपस्थित होते.
हॉक्बर्ग म्हणाले, की अमेरिकी निर्यात व रोजगारसंधी वाढविण्यासाठी अमेरिकेने भारतीय बाजारपेठेकडे विशेष लक्ष देण्याचे ठरविले आहे. मेक्सिकोनंतर भारत सर्वाधिक उद्योगसंधी असणारा देश आहे. लघुउद्योग, विमान उद्योग, पेट्रोकेमिकल, इंजिनिअिरगमध्ये मोठी संधी आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येइतके मध्यमवर्गीय भारतामध्ये राहतात. त्यामुळे इथे प्रचंड उद्योगसंधी आहेत. एअर इंडिया हा आमच्या बँकेचा भारतातील सर्वात मोठा ग्राहक होता. मात्र, सध्या रिलायन्स पेट्रोकेमिकल सर्वात मोठा ग्राहक आहे. चीनपेक्षा भारतात बाजारपेठ मोठी आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भारत हा उत्तम पर्याय आहे.
नवा भारत पुण्यातून उभा राहतोय
पुण्यातील उद्योगाबाबत बोलताना हॉक्बर्ग म्हणाले, की पुण्याचे उद्योगाचे क्षेत्र झपाटय़ाने विस्तारते आहे. त्यामुळे नवा भारत पुण्यातून उभा राहतो आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, निर्मितीच्या क्षेत्र पुण्यात विस्तारत चालले आहे. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे काम एखाद्या अमेरिकन कंपनीकडे आले, तर आमची बँक या प्रकल्पासाठी पतपुरवठा करू शकेल.
.
खोब्रागडे प्रकरणामुळे संबंधांवर परिणाम नाही
देवयानी खोब्रागडे प्रकरणामुळे भारत व अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होईल का, या प्रश्नावर हॉक्बर्ग म्हणाले, की जगात इतर देशांच्या तुलनेत भारताशी अमेरिकेचे संबंध दृढ आहेत. त्यामुळे या संबंधांवर परिणाम होणार नाही. पेप्सी, मायक्रोसॉफ्ट आदी अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष भारतीय आहेत. दहा हजारांपेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतात. या सर्व गोष्टी पाहिल्या, तर भारत-अमेरिका संबंध बिघडण्याचे कारण नाही.