राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय प्रांतिक बैठकीला फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत शनिवारी (आज) सुरूवात झाली. सरसंघचालक मोहन भागवत या बैठकीस पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव आणि पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी या वेळी उपस्थित होते. 

बैठकीच्या सुरवातीला गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील विशेषतः करोना काळात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेले लष्करी जवान, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस अधिकारी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील मान्यवर नागरिक व संघ कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

दोन दिवसीय बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २०२५ साली शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम, केंद्रीय प्रतिनिधी सभेमध्ये सांगोपांग विचार केल्याप्रमाणे शाखा विस्तार, कार्यकर्ता गुणवत्तावाढ, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, समरसता, समाजात चांगल्या कामासाठी सज्जनशक्तीची जोडणी, संघकामातून परिवर्तन, समाजात सकारात्मक विमर्षाची मांडणी आणि समाजातील रोजगारांच्या संख्येतील वाढीच्या दृष्टीने कार्यक्रम आणि उपक्रमांवर विस्ताराने चर्चा तसेच नियोजन करण्यात आले. 

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील पुणे महानगरासह सात जिल्हे, तालुका स्तरापर्यंतचे प्रमुख सुमारे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले आहेत. डॉ.प्रवीण दबडघाव यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघकार्य, सेवाकार्य विशेषत: करोना काळातील मदतकार्याचा आढावा घेत बैठकीतील विषयांची मांडणी केली.

पुस्तकाचे प्रकाशन  –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर संघमय जीवन जगले. त्यांची संघ तपश्चर्या मोठी होती, कार्यकर्ता घडविण्यासाठी ‘संघयोगी’ हे सुरेशराव केतकर-आठवणी व लेखांचे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय प्रांतिक बैठकीच्या सत्रात स्नेहल प्रकाशनतर्फे ‘संघयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुरेशराव केतकर यांचे पुतणे शिरीष केतकर, प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांच्यासह नानासाहेब जाधव आणि डॉ. प्रवीण दबडघाव या वेळी उपस्थित होते.