ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पाणपोईच्या धर्तीवर गेली बारा वर्षे उन्हाळ्यात ताकपोयी चालवणारे लक्ष्मीदास जाधवजी ठक्कर (वय ७६) यांचे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. बच्चूभाई भायाणी या नावाने ते सर्वपरिचित होते.
बच्चूभाई भायाणी यांचा विविध संस्थांच्या स्थापनेत मोलाचा वाटा होता. पुणे गुजराथी शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे गुजराथी बंधू समाज, अलायन्स क्लब, जलाराम सत्संग मंडळ, पुणे लोहाणा समाज आदी संस्थावर त्यांनी अनेक वर्षे पदाधिकारी तसेच सल्लागार म्हणून काम केले होते. प्रसिद्धीपासून दूर राहून नि:स्वार्थी वृत्तीने त्यांनी अनेक सेवाकार्य चालवली होती. अनेक सामाजिक कामांना, उपक्रमांना त्यांनी सढळ हाताने देणग्याही दिल्या होत्या. विविध संस्थांचेही ते आधार होते. निरलस वृत्तीने काम करणारे सेवाभावी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. उन्हाळ्यात पाणपोईप्रमाणे ताक देणारी ताकपोयी बच्चुभाईंनी गेली बारा वर्षे स्वखर्चाने मंडई परिसरात चालवली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.