नाटकाची पहिली घंटा होते.. प्रेक्षागृहात पडद्यामागे काहीतरी जोरदार हालचाली सुरू आहेत याची जाणीव व्हायला लागते. थोडय़ा वेळाने २ मिनिटे झाली.. आटपा.. दुसरी घंटा झाल्यावर गडबड वाढल्याचे जाणवते. म्युझिक रेडी?, लाईट्स. असे प्रश्न ऐकू यायला लागतात. सगळीकडून प्रतिसाद येतो आणि काही क्षणातच सगळं काही शांत होते.. पदडा वर जातो. प्रेक्षकांना दिसणाऱ्या सादरीकरणापूर्वी काही मिनिटे पडद्यामागे एक नाटय़ रंगलेले असते आणि त्याचे मुख्य भाग असतात नाटकातील महत्त्वाची भूमिका बजावणारे पडद्यामागचे कलाकार.
काही महिने केलेली मेहनत एका तासांत मांडणे हे एकांकिका स्पर्धाचे वैशिष्टय़. नेपथ्य उभे करण्यापासून ते सादरीकरण आणि त्यानंतर पुन्हा सगळे नेपथ्य काढून रंगमंच पूर्वीसारखा करणे हा सगळा प्रवास एक तासात करण्याचे आव्हान ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतही विद्यार्थ्यांसमोर होते. परीक्षेच्या या एका तासाचे आव्हान पेलण्यात महत्त्वाची भूमिका होती पडद्यामागील कलाकारांची. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, संघाचे व्यवस्थापन, वेशभूषा, प्रॉपर्टीज अशी सगळी जबाबदारी सांभाळून अभिनेत्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हे कलाकार झटत होते. या तासाभरात येणाऱ्या सगळ्या तांत्रिक गोष्टींची जबाबदारी या कलाकारांची हे ठरलेलेच होते. कोणी किती पावले चालायचे, रंगमंचावरील कोणत्या वाक्याला विंगेत काय नेऊन ठेवायचे..अगदी मिनिटा मिनिटाचे व्यवस्थापन प्रत्येक संघाने केले होते. वेळेचा अचूक अंदाज येण्यासाठी प्रत्येक संघाने आपापल्या काही क्लृप्त्याही निश्चित केल्या होत्या.
‘सादरीकरण सुरू होण्यापूर्वी गाण्यांवरून आम्ही अंदाज बांधले. कोणते गाणे लागले म्हणजे किती मिनिटे झाली हे सगळ्यांना माहिती होते. त्याप्रमाणे आम्ही वेळेचे व्यवस्थापन केले. आम्हाला एकांकिकेत पिंपळाचे झाड उभे करायचे होते. ते वजनाला हलके आणि स्वस्त असे हवे होते. त्यासाठी मग रद्दी वापरून आम्ही हे झाड उभे केले,’ असे फग्र्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले. आमच्या पैकी सर्वानाच रंगमंचावर डोळे मिटूनही वावरता आले असते, कोठे काय ठेवलेले आहे, नेपथ्यातील कोणती गोष्ट किती पावलांवर आहे ते निश्चित होते. आम्ही सराव करतानाही डोळे मिटून करायचो. डोळे मिटायचे आणि एखादी वस्तू योग्य जागी नेऊन ठेवायची अशा पद्धतीने सराव आम्ही केला होता,’ असे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘आयत्यावेळी येणाऱ्या सर्व अडचणी सांभाळण्याचे काम हे पडद्यामागच्या कालाकारांचे असते. काही तुटले, सापडले नाही तर कोणत्याही परिस्थितीत पर्याय शोधणे ही जबाबदारी पेलावी लागते,’ असे एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांगितले.