महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांना पराभव दिसू लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यातूनच त्यांनी काँग्रेसबद्दल जी दिशाभूल करणारी वक्तव्य केली, त्याबद्दल पायगुडे यांच्यावर दावा दाखल करणार असल्याचे आमदार रमेश बागवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पायगुडे यांनी ‘लोकसत्ता’शी केलेल्या वार्तालापात सुरेश कलमाडी आणि रमेश बागवे यांच्याकडून मदत होत असल्याचे सांगितले होते. पायगुडे यांच्या या वक्तव्यावर बागवे यांनी बुधवारी जोरदार टीका करत पायगुडे यांच्याकडून झालेल्या बदनामीबद्दल त्यांच्यावर दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. काँग्रेसला दलित, मुस्लीम, मागासवर्गीय, झोपडपट्टीवासीय आदी साऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून आमच्या पदयात्रा, मेळावे यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उलट पायगडे यांच्या मेळाव्यांना आणि प्रचारफेऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांना पराभव दिसू लागला आहे, असे बागवे म्हणाले.
काँग्रेस मदत करत असल्याचे वक्तव्य पायगुडे यांनी केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्तेही संतप्त झाले आहेत. तरीही या सर्वाना शांत करून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता अत्यंत जोरदार पद्धतीने मतदानातूनच प्रतिक्रिया व्यक्त करू, असे आम्ही सर्वाना सांगितले आहे. आम्ही मतांच्या माध्यमातूनच आता पायगुडे यांना उत्तर देऊ, असेही बागवे म्हणाले. मनसेच्या अंतर्गत सध्या जी लाथाळी सुरू आहे ती आम्हालाही माहिती आहे. मात्र त्याबाबत आम्ही काही बोलत नाही. त्याबाबत पायगुडे यांनीच काय ते सांगावे, असेही ते म्हणाले.