कानाची बाह्य़रचना योग्य नसल्यामुळे ज्यांना ऐकू येत नाही अशा बालकांवरील आधुनिक ‘बाहा इम्प्लांट’ शस्त्रक्रिया आता पुण्यातही होऊ शकणार आहे. केईएम रुग्णालयात ८ वर्षांच्या एका बालकावर नुकतीच या प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून देशातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे.  
केईएम रुग्णालयातील कान- नाक- घसा तज्ज्ञ डॉ. नीलम वेद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘ज्या बालकांच्या कानाचा बाह्य़ आकार योग्य असतो त्यांच्या श्रवणदोषावर श्रवणयंत्राच्या आधारे उपचार करणे शक्य होते. मात्र कानाची बाह्य़ रचनाच योग्य नसल्यास अशा व्यक्तीला श्रवणयंत्र लावणे शक्य होत नाही. श्रवणदोष असलेल्या अशा व्यक्तींसाठी ‘बाहा इम्प्लांट’ ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरू शकते,’ असे डॉ. नीलम यांनी सांगितले.
बाहा इम्प्लांट हे लहानसे यंत्र कानाच्या जवळ डोक्याच्या त्वचेच्या आत शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. तर या यंत्राला नियंत्रित करणारे ‘स्पीच प्रोसेसर’ हे उपकरण त्वचेच्या बाहेर बसवले जाते. या दोन्ही उपकरणांच्या मधल्या बाजूस लोहचुंबक असते. डॉ. नीलम म्हणाल्या, ‘‘बाहा इम्प्लांटमधील नवीन प्रकारचे यंत्र त्वचेच्या पूर्णत: आत राहत असून ते एकदा बसवल्यानंतर पुन्हा त्याची शस्त्रक्रिया करावी लागत नाही. काहीही बदल करायचा असेल तो त्वचेबाहेरील स्पीच प्रोसेसरमध्ये शस्त्रक्रियेविना करता येतो. बाहा इम्प्लांटची किंमत सुमारे ४ लाख ९८ हजार रुपये आहे. हे यंत्र बसवल्यावर त्याच्या बॅटरीसाठी प्रतिवर्षी अंदाजे पाचशे रुपयांचा खर्च येतो.’’
दर शुक्रवारी दुपारी ११ ते २ या वेळात केईएम रुग्णालयात कानाची बाह्य़रचना योग्य असलेल्या पण कर्णबधिरत्व असलेल्या बालकांना, तसेच कानाच्या सदोष बाह्य़रचनेमुळे ऐकू न येणाऱ्या बालकांसाठीही मोफत बाह्य़रुग्ण विभाग चालवला जात असल्याचे डॉ. वेद यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ०२०-६६०३७४८२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.