पुणे : रंगमंदिरामध्ये डासांचा प्रादुर्भाव, उंदीर आणि घुशींचा सहजपणे वावर, तुटके कमोड, साचलेली घाण आणि तुटलेले फ्लश टँक हे चित्र सध्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये दैनंदिन पाहावयास मिळते. ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ऐवजी ‘आबाळगंधर्व रंगउंदीर’ असे नाव ठेवायला मनपाचं काही ‘अडलंय का?’, असा सवाल रंगकर्मीनी उपस्थित केला आहे.
प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे आणि नाटय़निर्मात्या व अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी या दुरवस्थेविषयी संताप व्यक्त केला आहे.
पेठे म्हणाले, की आम्ही नुकताच ‘अडलय का?’ नाटकाचा प्रयोग केला. रंगमंचावर संवादफेक करण्यासाठी तोंड उघडले की डास तोंडात जाईल की काय ही धास्ती होती. केवळ कलाकारांनाच नाही, तर प्रेक्षकांनाही डासांनी हैराण केले होते. इतकी आबाळ कशासाठी आहे? कमोड तुटलेले असून घाण साचलेली आहे. फ्लश टँक तुटलेले आहेत. हे आपल्या शहरातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानतो आपण, तर किमान गोष्टींची पूर्तता का करता येत नाही? हे काही बरोबर नाही. आम्हाला त्याचा संताप आला आहे. यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे चांगल्या सुविधा असल्याबद्दल कौतुकदेखील केले आहे.
देसाई म्हणाल्या,की नाटकाच्या सेटचे साहित्य ठेवण्यासाठी निर्मात्यांकडून गाळय़ासाठी वार्षिक २४ हजार रुपये शुल्क आकारले जाते. तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. उंदीर-घुशींचे साम्राज्य असते. पावसाळय़ामध्ये तर पाणी जाऊन साहित्याची नासधूस होईल का याची धाकधूक असते. महिला कलाकारांसाठी कपडे बदलण्याच्या खोलीचे पडदे काढून टाकण्यात आले आहेत. स्वच्छतागृहाची दारे मोडकी आहेत. टाकी अखंड वाहत असते. मेकअपसाठी दिवे आवश्यक असताना त्या खोलीमध्ये टय़ूबलाईट लावण्यात आल्या आहेत. त्यावर दिवे चोरीला जातात, असे कारण सांगितले जाते.
कितीतरी अडचणी..
रंगमंदिरामध्ये प्रयोग सुरू असतानाच अनेकदा डागडुजीच्या कामांचे ठोकण्याचे आवाज ऐकू येतात. वातानुकूलन यंत्रणा सुरू केली जाते,पण नाटकाच्या दुसऱ्या अंकाच्या मध्यावर वातानुकूलन यंत्रणा बंद केली जाते. ध्वनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही हेदेखील वास्तव आहे. उपाहारगृह आणि पार्किंग या समस्या तर सुटण्याची चिन्हे दिसतच नाहीत, याकडे रंगकर्मीनी लक्ष वेधले.
नीट सुविधा हव्यात..
बालगंधर्व रंगमंदिराची दुरवस्था गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहे. ते पाडायचेच असेल तर किमान आता तरी कलाकार आणि प्रेक्षकांना नीट सुविधा द्याव्यात. रसिक प्रेक्षकांचे हाल करून त्यांना त्रास का द्यायचा, असा प्रश्न अतुल पेठे यांनी उपस्थित केला. बालगंधर्व रंगमंदिराची अवस्था संतापजनक अशीच आहे. त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही याचा अर्थ महापालिकेला मुद्दाम लक्ष द्यायचे नाही, असेही ते म्हणाले.
नाटकात नकोशी गुणगुण..
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे सध्याचे चित्र ओंगळवाणे वाटावे असे झाले आहे. कलाकारांना मूलभूत सुविधा तर मिळत नाहीतच,पण प्रेक्षकांनाही नाटक पाहताना डासांच्या गुणगुणण्याचे संगीत कानामध्ये ऐकू येते.