एलबीटी (स्थानिक संस्था कर) संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा कांगावा करत एलबीटी करप्रणाली रद्दच करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी सोमवारी पुन्हा आंदोलनाला सुरूवात केली. एक एप्रिलपासून एलबीटी लागू झाली असताना व बहुतांश व्यापारी पैसे भरत असताना बाबरांनी पुन्हा व्यापार बंदचे आवाहन करून नागरिकांना वेठीस धरण्यास सुरूवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या बाबर यांनी एलबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापार बंदचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनास काही भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर, गावठाणांसह अन्य भागामध्ये बिलकूल प्रतिसाद मिळाला नाही. व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत. त्यासाठी दोन दिवसीय बंद पुकारण्यात आला असून सोमवारी व मंगळवारीसुध्दा दुकाने बंद राहणार असल्याचे बाबर यांनी म्हटले आहे.
एकीकडे बंदचे आवाहन फेडरेशनकडून करण्यात आले असताना दुसरीकडे, व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी एलबीटीचा भरणा करण्यास यापूर्वीच सुरूवात केली आहे. पिंपरी महापालिकेकडे एप्रिलमध्ये ५२ कोटी व मे महिन्यात ७४ कोटी रूपये एलबीटीचा भरणा झाला आहे. जून महिन्यातील एलबीटी भरणा २० जुलैपर्यंत होणार आहे. आतापर्यंत साडेसहा कोटी भरले गेले आहेत. त्यामुळे ठराविक व्यापारीच एलबीटीला विरोध करत असल्याचे चित्र पुढे आले आहे.