आधार नोंदणी यंत्रणेला बँकांकडून अत्यल्प प्रतिसाद
बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे किमान एक आधार केंद्र सुरू करणे केंद्र शासनाने बंधनकारक केले असले, तरी केंद्र शासनाच्या या निर्णयाला बँकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयानुसार शहरात बँकांमध्ये एक्याण्णव ठिकाणी आधार केंद्रे सुरू होणे अपेक्षित असताना केवळ दोन बँकांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे बँकांमधील आधार नोंदणी यंत्रणेला बँकांकडूनच अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. तसा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र दोन बँकांमध्येच ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. जुलै महिन्यातील या आदेशानंतर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी बँकांनी आधार कार्ड यंत्रणा सुरू करण्याची मागणी केली होती. केंद्राच्या आधारचे मुख्य निर्देशक डॉ. ए. बी. पांडे यांचीही त्यांनी सप्टेंबर महिन्यात भेट घेतली होती. तसेच बँकांशीही त्यांनी चर्चा केली होती.
संसदेच्या अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या आधार कार्ड काढण्याच्या अडचणींसंदर्भात बँकांकडून आधार यंत्रणा उभारणीला कसा प्रतिसाद आहे, याची माहिती त्यांनी घेतली. त्यामध्ये ही माहिती पुढे आली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार पुण्यातील बँकांनी आधार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार शहरातील २५ बँकांनी मिळून ९१केंद्रे निश्चित केली होती. पण यापैकी दोन केंद्रे सुरू झाली आहेत. ८९ केंद्रे सुरू करण्यात आलेली नसून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)आणि कार्पोरेशन बँकेच्या शाखेत ही दोन केंद्रे सुरू झाली आहेत.
‘यंत्रणा लवकरच’
बँकांनी आधार केंद्रे तत्काळ सुरू करावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सध्या दोन बँकांकडून ही यंत्रणा उभारली असली, तरी येत्या महिनाभरात सर्व बँकांमधील आधार नोंदणी यंत्रणा कार्यान्वित होईल. लीड बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांनी तशी ग्वाही दिली आहे, असे पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.