‘डोळ्यासमोर पूल वाहून गेला’

सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर घडले.

महाड येथील दुर्घटनेनंतर अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या बसंत कुमार यांचा दादा कोंडके समाज भूषण पुरस्काराने गौरव

मध्यरात्री समोरच्या पुलावरून जात असलेल्या वाहनांचे दिवे अचानक दिसेनासे झाले. मी तर घाबरून गेलो होतो आणि पायही लटलटू लागले होते. सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर घडले. आधीच अंधार आणि अन् त्यातही पावसाचा जोर.  प्रसंगावधान राखून मी वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. कदाचित माझ्या धास्तीमुळे न थांबलेली वाहने सावित्रीच्या पोटात गडप झाली. एक वाहन कसेबसे थांबले आणि त्याच्यापाठीमागे वाहनांची रांग लागल्याने अनेकांचे जीव वाचले.. तीन आठवडय़ांपूर्वी घडलेल्या या कटू आठवणींना बसंत कुमार यांनी बुधवारी उजाळा दिला.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर वाहतूक रोखून धरण्याचे काम चोखपणाने करीत अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या बसंत कुमार यांना दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनतर्फे बुधवारी दादा कोंडके समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते, राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी संचालक विजय कोलते, ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले, डॉ. राजेंद्र भवाळकर, विक्रम जाधव, परशुराम शेलार या वेळी उपस्थित होते.

पूल कोसळला हे पाहिल्यानंतर मी काम करीत असलेल्या गॅरेजचे मालक लालू गुप्ता यांना ही माहिती कळवली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले. तोपर्यंत काही वाहनांचा मार्ग थोपवून धरण्यामध्ये आम्हाला यश लाभले होते. त्या क्षणी मला जे करावेसे वाटले तेच मी केले. हे मानवतेचे काम आहे याची पावती या पुरस्काराने मिळाली, असे बसंत कुमार यांनी सांगितले. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले बसंत कुमार दोन वर्षांपासून महाडमधील एका गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणून काम करीत आहे. यापूर्वी हेच काम ते पुण्यातील कात्रज परिसरात करीत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Basat kumar get award in pune

ताज्या बातम्या