पुणे : नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी, महिला, रोजगार याबाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात फरक आहे. सत्तेचा उन्माद काय असतो हे मोदींनी दाखवले आहे. त्यामुळे आता त्यांना सत्ता द्यायची नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. मोदींचा पराभव करण्यासाठी तयार रहा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्ला चढवला.  पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या सभेत पवार बोलत होते.

हेही वाचा >>> अमोल कोल्हे यांची संपत्ती पाच वर्षांत झाली दुप्पट

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र धंगेकर, बारामती मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी एकत्रच उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या सभेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. विश्वजित कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, की २०१५ मध्ये पेट्रोल ७१ रुपये होते. आज १०६ रुपये झाले आहे. ४१० रुपयांचा सििलडर ११६० रुपये झाला. तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दहा वर्षांत नोकऱ्या कमी झाल्या. मोदींवर टीका केली म्हणून झारखंड, दिल्लीचे मुख्यमंत्री, बंगालच्या तीन मंत्र्यांना तुरुंगात टाकले. देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे.