बेल्जियमला जाण्यासाठी व्हिसाची मागणी करणाऱ्या पुणेकरांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. बेल्जियमला जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन बेल्जियम आणि व्हीएफएस ग्लोबल या संस्थांतर्फे ताडीवाला रस्त्यावरील सोहराब सभागृहात बेल्जियम व्हिसा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
बेल्जियमचे मुंबईतील कौन्सल जनरल कार्ल व्ॉन डेन बॉश यांनी मंगळवारी या केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते दुपारी ४.३० या वेळात सुरू राहणार आहे. व्हीएफएस ग्लोबल कंपनीच्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मुरली राघवन या वेळी उपस्थित होते.
गेल्या वर्षी देशातील ३४ हजार नागरिकांनी बेल्जियमचा व्हिसा काढण्यासाठी अर्ज केले होते. यांपैकी १० हजार नागरिक महाराष्ट्रातील आणि त्यातही सुमारे ४५ टक्के नागरिक पुण्याचे असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
देशात सहा ठिकाणी नव्याने बेल्जियम व्हिसा अॅप्लिकेशन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात पुण्यासह चेन्नई, अहमदाबाद आणि हैद्राबादचाही समावेश आहे. पुणे शहर उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असल्यामुळे हे केंद्र आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे व्ॉन डेन बॉश यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या व्हिसा अॅप्लिकेशन केंद्रात अर्ज करणाऱ्या नागरिकांचे पारपत्र तीन दिवसांच्या आत त्यांना परत मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भारताबरोबरचे सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासाठी बेल्जियमचे प्रयत्न सुरू आहेत. चेन्नईत बेल्जियमचे कॉन्सुलेट जनरल सुरू करण्यात येणार आहे. तसेच २३ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापारी शिष्टमंडळ दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला भेट देणार आहे.’’
‘युरोपालिया’ या बेल्जियमच्या राष्ट्रीय उत्सवाचे उद्घाटनही राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार असल्याचे व्ॉन डेन बॉश यांनी सांगितले.
बेल्जियमबरोबर देशाचा
व्यापार १३ अब्ज युरोचा
बेल्जियम आणि भारत या देशांचा द्विपक्षीय व्यापार १३ अब्ज युरोचा असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. यात हिऱ्यांच्या व्यापाराचा वाटा सर्वाधिक म्हणजे ८ ते ९ अब्ज युरोचा आहे. त्याखालोखाल चॉकलेटस्, वाहन उत्पादन आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांतील व्यापाराचा वाटा आहे.