ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी भारतातील लोकशाहीवर मोठं विधान केलं आहे. “भारतात खरंच लोकशाही धोक्यात आहे. तुम्ही खरं बोलल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षणात राहावं लागतं. सरकारी धोरणापेक्षा उलटं बोललं तर तुमची चौकशी होते,” असं मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (२५ एप्रिल) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

भालचंद्र नेमाडे म्हणाले, “आपल्याकडे लोकशाही खरंच धोक्यात आहे. खरं बोलल्यावर तुम्हाला पोलीस संरक्षणात राहावं लागतं. तुम्ही सरकारी धोरणाप्रमाणे वागला तर तुम्ही नीट राहता आणि तुम्ही त्या सरकारी धोरणापेक्षा उलटं बोलला की तुमची चौकशी होते. हे काही लोकशाहीचं लक्षण नाही. खरंतर स्वतःच्या पक्षातील लोकांच्या चौकशा केल्या पाहिजेत. ती लोकशाही असते. दुर्दैवाने तसं होत नाही.”

“त्यामुळे मला फार वाईट दिवस काढावे लागले”

“मलाही एक पत्र आलं होतं. त्यामुळे मला फार वाईट दिवस काढावे लागले. मला आता लक्षात आलं आहे की, बोलण्याचा उपयोग नसेल, तर बोलू नये. नाही तर आपली महत्त्वाची कामं राहून जातात. मी गोव्याला होतो तेव्हापासून २५ वर्षांपासून माझा कवितासंग्रह पडलेला होता. ते काम पूर्ण करणं या मूर्ख लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा बरं आहे,” असं मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं.

“जगात भारतीय लोक चमकणं हे तिकडल्या लोकांचं मोठेपण”

भालचंद्र नेमाडे पुढे म्हणाले, “आपली माणसं जगभरात चमकत आहेत. ही नैसर्गिक गोष्ट आहे. ते इतक्या पिढ्या तिथं राहिले तर त्यांनी तिथं चमकणं आवश्यकच आहे. खरंतर तो तिथल्या लोकांचा मोठेपणा आहे, आपला नाही. आपल्याकडे इतके चांगले लोक असताना आपण निवडून देत नाहीत. आपल्याकडे पूर्वी मौलाना आझाद यांच्यासारखे लोक होते. तो आपला मोठेपणा होता. तसा मोठेपणा आज आपल्यात राहिला नाही.”

हेही वाचा : “…म्हणून माझी जिरवू नका”, ‘त्या’ निवडणुकीबाबत अजित पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

“आपण आपल्यातील क्षुद्र लोक वरती पाठवायला लागलो”

“आपण आपल्यातील क्षुद्र लोक वरती पाठवायला लागलो. दुसऱ्या जाती-धर्माच्या लोकांना आपण परके समजून त्यांना लायकी असून लायकी देत नाही हे आपलं चुकतं आहे,” असं स्पष्ट मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी रोज वर्तमानपत्र वाचत नाही, कारण…”

“मी रोज वर्तमानपत्र वाचत नाही. मी काही काळ वाचत होतो, पण नंतर लक्षात आलं की, त्यात खरं येत नाही. त्यातून जे मिळतं ती सर्व माहिती असते. सत्य काय हे आपल्याला शोधूनच काढावं लागतं. विमानात वर्तमानपत्र पडलेलं असेल तर काय चाललं आहे हे कधीकधी पाहतो. मात्र, ते वाचताना मला फार काही सुधारणा दिसत नाही,” असंही नेमाडेंनी नमूद केलं.