scorecardresearch

पुणे: भांडारकर संस्थेचा ‘गीतेविना श्रीकृष्ण’ संशोधन प्रकल्प; वर्षभरात वाचकांच्या हाती ग्रंथ देण्याचा मानस

श्रीकृष्ण म्हटल्यावर भगवद्गीता लगेच आठवते, पण, भगवद्गीता हा श्रीकृष्ण चरित्राचा एक भाग आहे ही भूमिका घेऊन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने ‘गीतेविना श्रीकृष्ण’ हा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे.

पुणे: भांडारकर संस्थेचा ‘गीतेविना श्रीकृष्ण’ संशोधन प्रकल्प; वर्षभरात वाचकांच्या हाती ग्रंथ देण्याचा मानस
भांडारकर संस्थेचा ‘गीतेविना श्रीकृष्ण’ संशोधन प्रकल्प(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

भगवद्गीता आणि भगवान श्रीकृष्ण हे अनोखे समीकरण आहे. त्यामुळे श्रीकृष्ण म्हटल्यावर भगवद्गीता लगेच आठवते, पण, भगवद्गीता हा श्रीकृष्ण चरित्राचा एक भाग आहे ही भूमिका घेऊन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने ‘गीतेविना श्रीकृष्ण’ हा संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत वर्षभरात वाचकांच्या हाती ग्रंथ देण्यात येणार असून श्रीकृष्ण चरित्रातील काही प्रसंगांचे विवेचन करणारे ऑडिओ-व्हिडिओ करण्याचा संस्थेचा मानस आहे.

हेही वाचा >>>पुणे: भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेल्या ‘मिडी बस’ पीएमपी परत घेणार

भगवान श्रीकृष्णाचा आजवरचा अभ्यास हा प्रामुख्याने भगवद्गीतेला केंद्रबिंदू ठेवून झाला आहे. मात्र, श्रीकृष्णाचे व्यवहार कौशल्य, बुद्धिचातुर्य आणि नीतीमत्ता या विषयांवर पुरेसा प्रकाश पडलेला नाही. त्या दृष्टीने असा संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशी सूचना करून श्रीकृष्ण भक्त आणि मुंबई येथील उद्योजक सुधीर पारेख यांनी संस्थेला या प्रकल्पासाठी अर्थसाह्य देण्याचे मान्य केले. त्यानुसार नियामक मंडळाचे सदस्य डाॅ. सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने या प्रकल्पाची सुरुवात केली असून त्यांना प्रतिमा वामन या सहकार्य करत आहेत. या संशोधन प्रकल्पासाठी महाभारत आणि भागवत पुराणातील श्रीकृष्ण चरित्रातील कथा आधारभूत मानण्यात येणार आहे, अशी माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली.

हेही वाचा >>>राज्यातील महापालिकांमध्ये बेकायदा खासगी सुरक्षारक्षक; जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून पुणे महापलिकेविरूद्ध पाच खटले

भगवान श्रीकृष्णावर अभ्यास करून मी यापूर्वी ‘या सम हा’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. मात्र, हा प्रकल्प महाभारतापुरता केंद्रित आहे आणि महाभारताचा अभ्यास हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा प्रकल्प संस्थेच्या कामाचाच एक भाग आहे, असे मी मानतो. भगवद्गीता वगळता श्रीकृष्णाकडे कोणी फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. भगवद्गीतेला धर्मग्रंथाचा, तात्त्विक ग्रंथाचा दर्जा मिळाला. त्यामुळे श्रीकृष्णाच्या विविध पैलूंकडे लक्ष देण्याचे काम या प्रकल्पाद्वारे करण्यात येणार आहे.- डाॅ. सदानंद मोरे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 10:54 IST

संबंधित बातम्या