पुणे : ‘केवळ दर्जा मिळाला म्हणून कोणतीही भाषा अभिजात होत नसते. तर, त्या भाषेत जी. ए. कुलकर्णी यांच्यासारखे लेखक असणे आवश्यक असते,’ असे मत ‘अंतर्नाद‘ मासिकाचे संपादक भानू काळे यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘सध्याच्या काळात प्रसिद्धी माध्यमांद्वारे मराठी भाषेविषयी जो उमाळा व्यक्त होतो, त्यामागे केवळ राजकीय कारणे आहेत,’ अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी या वेळी केली.
ज्येष्ठ कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या वतीने डॉ. संजीव कुलकर्णी लिखित ‘जीएंच्या तीस कथा : अनुभूती आणि आस्वाद’ या पुस्तकाचे प्रकाशन भानू काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी काळे बोलत होते. ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी, जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर या वेळी उपस्थित होत्या.
काळे म्हणाले, ‘केवळ ६५ वर्षांचे मर्यादित आयुष्य लाभलेल्या जीएंच्या पुस्तकांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली. जीए लेखन करीत होते त्या काळात नियतकालिकांद्वारे कथाकार घडण्याची प्रक्रिया होत असेे. ललित साहित्य छापण्याची वानवा सध्या दिसून येत असल्याने कथाकार घडण्याची प्रक्रिया खंडित होते आहे की काय, अशी शंका येते. अनेकांच्या कथा प्रारंभी नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि कालांतराने ते लेखक कथाकार म्हणून नावारूपास आले. बैठक मारून निवांतपणे वाचन करण्याचा वेळ सध्याच्या पिढीकडे नसल्याने कथा या साहित्य प्रकाराकडे वळणाऱ्या वाचकांची संख्या कमी झालेली दिसून येते.’
कुलकर्णी म्हणाल्या, ‘आपण ज्या वातावरणात जन्म घेतो आणि आपली जडणघडण होते त्यामध्ये अनुभवांचे संचित जमा होत असते. वाचकांच्या त्या अनुभवांवर आधारित संचिताला जीए. त्यांच्या लेखनातून साद घालतात. त्यांच्या कथा वाचताना आपण केवळ गुंतून जात नाही तर दिङ्मूढ होतो. जीए हे केवळ खोली असलेले लेखक नव्हते. तर, ते एक संवेदनशील कथाकार होते. त्यांच्या कथांमधून उत्तर कर्नाटकचे वातावरण अनुभवास येते.
श्रद्धा-अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात अडकलेल्यांच्या समजुती बदलण्यास भाग पडेल अशा ताकदीचे त्यांचे लेखन होते. कथांमधून केलेल्या वातावरण निर्मितीद्वारे व्यक्तही करता येणार नाही, अशा अवस्थेपर्यंत जीए आपल्याला नेऊन सोडतात. मला जीए पूर्ण समजले आहेत, असा दावा जीएंचा चाहता किंवा अभ्यासक देखील करू शकत नाहीत. त्या अर्थाने जीए चिमटीत सापडत नाहीत.’डॉ. संजीव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये लेखनामागची भूमिका मांडली. पल्लवी गोरे यांनी सूत्रसंचालन केले.