शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी मुळशी तालुक्याचा पथदर्शी प्रकल्पांमध्ये समावेश करण्यात आला असून, डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत भारतनेट प्रकल्पानुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. माहिती-तंत्रज्ञान विभागाचे मुख्य सचिव विजयकुमार गौतम यांनी शुक्रवारी मुळशीत झालेल्या बैठकीत याबाबतची माहिती दिली.

बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम. शंकरनारायण, भारतनेटचे मुख्य सरव्यवस्थापक ए. के. सक्सेना, सरव्यवस्थापक संजय सेठी, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप उपस्थित होते. गौतम म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेला पर्यावरणपूक आणि आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि योजनांचा लाभ थेट ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचावा, यंत्रणेतील दोष दूर व्हावा यासाठी देशभरातील २८ हजार ग्रामपंचायतींना इंटरनेटद्वारे जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी सुमारे आठ हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या योजनेद्वारे ग्रामीण भागात १४ एमबीपीएस गतीने डाटा वहन करण्याची यंत्रणा उभारण्यात येत आहे.

योजनेमुळे ग्रामीण भागातील जनतेला ई-हेल्थ, ई-क्लास रूम, ई-चावडी व अन्य योजनांचा लाभ मिळण्यास मोठी मदत होणार आहे. सध्याच्या विद्युत वितरण प्रणालीच्या जाळयांचा वापर करून इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे अ‍ॅपची निर्मिती करण्याबरोबरच संगणकीय प्रणाली निर्माण करण्यात येणार आहे.