‘बहुरूपी भारूड’चा उद्या २१०० वा प्रयोग
आपल्या लोकसंस्कृतीतील भारूड हे समृद्ध दालन आहे. नृत्य, संगीत, नाटय़, विनोद असे सारे काही भारुडामध्ये असलेल्या भारुडामध्ये एकीकडे कीर्तन परंपरेचा आविष्कार आहे. तर, दुसरीकडे अभिजात रंगभूमीचा उगम हा भारुडामधून झाला आहे. भारुडाची गोडी अवीट, अक्षर आणि अविनाशी आहे. माझ्यासाठी भारूड हे लोकसंवादाचे मुक्त विद्यापीठ आहे, अशी भावना संतसाहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.
गेल्या चार दशकांपासून भारूड या लोककलेची जोपासना करणाऱ्या देखणे यांच्या ‘बहुरूपी भारूड’ या कार्यक्रमाचा २१०० वा प्रयोग शनिवारी (१४ मे) बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होत आहे. ‘भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान’ हा विषय घेऊन पीएच.डी. संपादन केलेल्या देखणे यांनी ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी थेट गावगाडय़ापासून ते परदेशामध्ये ‘बहुरूपी भारूड’चे प्रयोग केले आहेत.
भारूड म्हणजे आध्यात्माचे निरूपण असे अशी सोपी व्याख्या सांगून देखणे म्हणाले, ज्ञानदेवांच्या आधीपासूनही लोककलावंत होता. वासुदेव, वाघ्या-मुरळी, गोंधळी, भराडी, पोतराज, कडकलक्ष्मी, भुत्या, पिंगळा असे वेगवेगळे लोककलावंत गावगाडय़ातील लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करीत होते. आपल्या संतांनी प्रबंधरचना केली. पण, भक्तीचळवळ बांधण्यासाठी त्यांना सामान्यांची भाषा आणि लोकांशी संवाद साधण्याचे माध्यम हवे होते. हे माध्यम होण्याचे काम भारुडाने केले. या परंपरा लोप पावत चालल्या आहेत. त्यांचे जतन करण्याच्या उद्देशातून बहुरूपी भारूड या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला कार्यक्रम करताना लोकांचे मनोरंजन आणि आत्मानंदाचा भाग होता. मात्र, हा कार्यक्रम एवढा लोकप्रिय होईल आणि २१०० प्रयोगांचा हा टप्पा गाठला जाईल, असे वाटले देखील नव्हते. एवढी वर्षे हा प्रयोग करून तोचतोचपणा आलेला नाही. उलट दरवेळी प्रयोग करताना नवा आनंद, ऊर्जा मिळते आणि सादरीकरणाच्या नवनवीन जागा सापडतात हा माझा अनुभव आहे.
भारूड हे वरवर पाहता एक गीतप्रकार आहे असे म्हणता येते. पण, भारुडाला व्यावहारिक आणि आध्यात्मिक असे दोन अर्थ आहेत. त्यातील रूपक समजल्याखेरीज भारुडाचा अर्थ समजणार नाही. हा अर्थ समजला नाही तर भारूड हे निव्वळ मनोरंजनाचे माध्यम होईल. भारुडामध्ये आलेला सासरा हा शब्द रूढार्थाने सासरा असला, तरी त्यामागे अहंकार हे रूपक आहे. रूपकामागच्या तत्त्वज्ञानामुळेच भारुडाला कीर्तनाच्या परंपरेचे मोठेपण लाभले आहे. सर्वच संतांनी भारूड लिहिले असले, तरी संत एकनाथांनी भारुडाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. कार्यक्रमातील निरुपण आणि बतावणी करताना आधुनिक संदर्भ घेता येतात. समाज आणि काळ बदलला असला, तरी मूल्यं बदलत नाहीत. बदलत्या माध्यमातून मूल्यं पोहोचवत गेलो तर समाज परिवर्तन होते, असेही देखणे यांनी सांगितले. माझ्याबरोबर काम करणारे अवधूत गांधी, अभय नलगे, हरिदास शिंदे, बाळासाहेब जाधव आणि भावार्थ देखणे हे तरुण कलाकार भारुडाची पालखी आपल्या खांद्यावर समर्थपणे वाहून नेतील, असा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharud is open university of people dialog says dr ramchandra dekhane
First published on: 13-05-2016 at 04:25 IST