खापरावरचे खानदेशी मांडे, खपली गव्हाची खीर, थालीपीठ, मासवडी, जळगावचे वांगे भरीत आणि पुरणपोळी, उकडीचे मोदक, मिरचीचा ठेचा, मावळी मटण, गावरान कोंबडी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, चुलीवरची भाकरी, खेकडा करी, मच्छी फ्राय, चिकन पकोडे, कोकणचा मेवा आणि कोळंबीची लोणची.. खाद्यपदार्थाची नुसती नावे ऐकली तरी तोंडाला पाणी सुटते. पण, या सर्व खाद्यपदार्थाचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी भीमथडी जत्रेत लाभणार आहे.
लोककला, हस्तकला आणि खाद्य महोत्सव अशी वैशिष्टय़े असलेली ‘भीमथडी जत्रा’ १० ते १४ डिसेंबर या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार आहे. ‘चला जाणून घेऊ महाराष्ट्र’ हे ब्रीद असलेल्या भीमथडी जत्रेत पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे भरविण्यात येणाऱ्या भीमथडी जत्रेचे यंदा ९ वे वर्ष आहे. या वर्षी २७२ स्टॉल्स आणि २९० हून अधिक बचत गटांचा सहभाग असलेल्या जत्रेमध्ये खाद्यपदार्थाचे ८० हून अधिक स्टॉल्स, पॅकेटेड फूडचे ८१ स्टॉल्स, सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनांचे ५० स्टॉल्स आणि बारा बलुतेदारांचे स्टॉल्स असतील, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त आणि भीमथडी जत्रेच्या प्रवर्तक सुनंदा पवार यांनी गुरुवारी दिली.
गेल्या वर्षी भीमथडी जत्रेला दीड लाख नागरिकांनी भेट दिली होती. एकावेळी दोन ते अडीच हजार व्यक्ती खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकतील एवढी ऐसपैस जागा ठेवण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी पहिले दोन दिवस सकाळी ११ ते दुपारी २ हा खास वेळ राखून ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांना जत्रेचा विनासायास फेरफटका मारता यावा यासाठी शंभरहून अधिक मदतनिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या सोयीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी सचिन खलाते (मो. क्र. ९८२२५२९९८७) यांच्याशी संपर्क साधावा. भीमथडी जत्रेत गेल्या वर्षी आग लागल्याची घटना घडली होती. ही बाब ध्यानात घेऊन यंदा कापडी मंडप असणार नाही. त्याचप्रमाणे जत्रेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पारंपरिक नृत्याविष्कार : धनगरी नृत्य, आदिवासी नृत्य, लमाणी नृत्य
समाजरचनेतील व्यावसायिक रूपांचे दर्शन : मेंढपाळ, लोहार, सुतार, कुंभार, पाथरवट, वैदू, चर्मकार, बुरुड, झाडूवाला, नंदीबैलवाला, बहुरूपी, वासुदेव, ज्योतिषी, डोंबारी, पोतराज
ग्रामीण कलांचे दर्शन : जात्यावरच्या ओव्या, भारुड, पथनाटय़, वाघ्या-मुरळी, गोंधळी,
लहान मुलांसाठी करमणूक : फिरते विक्रेते, मुंबईवाला, मोठा पाळणा, झोका
मर्दानी आणि पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके : तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब, विटी-दांडू, सागरगोटे, लगोरी, सुरपारंब्या, काचकवडय़ा, जिबल्या.