दत्ता जाधव

पुणे : साखर कारखान्यांचा गळीत हंगामाच्या सुरुवातीला इथेनॉल उत्पादनासाठीची ४५ लाख टन साखर वगळून यंदा देशात ३५७ लाख टन निव्वळ साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. सुधारित अंदाजानुसार ३३०-३३३ लाख टनच साखर उत्पादन होईल, असे उद्योगातील जाणकार सांगत आहेत. परिणामी यापुढे निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता नाही. साखरेचा किरकोळ बाजारातील सध्याचा ३५ रुपयांचा दर लवकरच ३८ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात निव्वळ साखर उत्पादन ३७५ लाख टन होईल, असा अंदाज होता.  सुधारित अंदाजानुसार ३३०-३३३ लाख टन साखर उत्पादन होईल. देशाला एका वर्षांला सुमारे २७५ लाख टन साखरेची गरज असते. शिवाय ६१ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. उत्पादन कमी होणार असल्यामुळे यापुढे साखर निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता नाही.

साखरेचे निर्यातदार  मुकेश गोयल म्हणाले, साखरेच्या उत्पादनात घटीचा अंदाज आहे. त्यामुळे दरवाढ होण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेचे दर ३५ रुपयांच्या दरम्यान आहेत. मेअखेपर्यंत साखरेचे किरकोळ बाजारातील दर ३८ ते ४० रुपयांदरम्यान जातील. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर चढे असले तरीही साखर निर्यातीला परवानगी मिळणार नाही. 

राज्यातील स्थिती काय?

राज्यात यंदा १३८ लाख टन साखर निर्मितीचा अंदाज होता. सुधारित अंदाज १२८ लाख टनांचा आहे. राज्यात वीस कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल, त्यासाठी सुमारे १६ लाख टन साखरेचा उपयोग केला जाईल. राज्यात एकूण ८० प्रकल्पांत इथेनॉल निर्मिती सुरू आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

उत्पादन कमी होण्याची कारणे

  • नव्याने लागवड केलेल्या उसाचे वजन देशभरात सरासरीच्या दहा टक्के कमी
  • खोडवा पिकाचे वजन सरासरीच्या वीस टक्के कमी
  • सलग चार महिने पाऊस सुरू राहिल्यामुळे उसाची अपेक्षित वाढ नाही
  • राज्यात मागील वर्षांइतकाच १४८७ लाख हेक्टरवर ऊस आहे. पण, वजनात मोठी घट
  • सोलापूर, मराठवाडा साखर विभागात वजनात मोठी तूट