संक्रांतीचा सण पतंग उडवून साजरा करण्याची प्रथा आता पुण्यातही चांगलीच लोकप्रिय झाली आहे. कोण कोणाचा पतंग काटणार या खेळातली उत्कंठा पक्ष्यांच्या मात्र जीवावर बेतत आहे. चालू महिन्यात पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांज्याने जखमी झालेल्या पक्ष्यांची संख्या शहरात लक्षणीय आहे. पतंग उडवण्याचा हंगाम जवळजवळ महिनाभर चालत असल्यामुळे आणखीही पक्ष्यांना या मांज्यामुळे प्राणास मुकावे लागणार का, असा प्रश्न आहे.
पुणे स्टेशन परिसरात जखमी पक्ष्यांना वाचवण्याचे काम करणारे पक्षीमित्र अनिल आवचिते यांच्याकडे जानेवारीत आतापर्यंत मांज्यामुळे जखमी झालेले ३० ते ३५ पक्षी आले आहेत. यात प्रामुख्याने घारी, कबुतरे आणि घुबडांचा समावेश होता. आवचिते म्हणाले, ‘‘पतंग कटल्यावर तो कुठेतरी पडून जातो आणि तुटलेला मांजा लटकत राहतो. अशा लटकणाऱ्या मांज्यात पक्ष्यांचे पाय किंवा पंख हमखास अडकतात. सुटण्यासाठी धडपड केल्यानंतर पक्षी त्यात अधिकच अडकतो. चायनीज मांजा हा वेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेने बनवलेला मजबूत तंतू असल्यामुळे पक्ष्यांना तो स्वत: तोडता येत नाही. अडकलेला पंख किंवा पाय सोडवता न आल्यामुळे त्यावर अतिरिक्त ताण येऊन तो सुजतो आणि त्या ठिकाणी मांजा काचून जखम होते. अशा अडकलेल्या पक्ष्याकडे अनेकदा नागरिकांकडून दुर्लक्ष केले जाते. जितका अधिक काळ पक्षी अन्नपाण्याविना जखमी स्थितीत अडकून राहतो तसा तो मृत्युपंथाला लागतो.’’
कात्रज येथील वन्य प्राणी अनाथालयात जानेवारी महिन्यात दाखल होणाऱ्या जखमी घारींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आकडेवारीवरून दिसते. २०१२ मध्ये या अनाथालयात १३ जखमी घारी दाखल झाल्या होत्या. २०१३ मध्ये ही संख्या १८ तर चालू महिन्यात आतापर्यंत ही संख्या ६ आहे. यातील सर्वच घारी मांज्यामुळे जखमी झाल्या नसल्या तरी मांजा घारींसाठी त्रासदायक ठरत असल्याचे निरीक्षण अनाथालयाचे अभिरक्षक दीपक सावंत यांनी नोंदवले. पक्षी जखमी होणे टाळण्यासाठी चायनीज मांजा वापरू नये तसेच पतंग कटल्यावर तुटलेला मांजा लगेच नष्ट करावा, असेही सावंत यांनी सांगितले.
पारवे आणि बगळेही चायनीज मांज्यामुळे जखमी होत असल्याचे पक्षीमित्र राजेंद्र परदेशी यांनी सांगितले. गेल्या वर्षी जानेवारीत परदेशी यांच्याकडे मांज्याने जखमी झालेले ३० पक्षी आले होते. संक्रांतीपासून पतंग उडवणे भरात येत असल्यामुळे यानंतर जखमी होणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.
काय काळजी घ्याल-
– पतंग उडवा पण चायनीज किंवा नायलॉनचा मांजा वापरू नका
– हाताने तोडता येईल असा मांजा वापरा
– पतंग कटल्यावर तुटलेला मांजा नष्ट करा
जखमी पक्षी सापडल्यास-
– आपल्या मनाने पक्ष्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करू नका
– त्वरित कात्रज येथील वन्य प्राणी अनाथालयास दूरध्वनी करा. दूरध्वनी क्रमांक- ०२०- २४३७०७४७
– याशिवाय शहराच्या विविध भागात काही पक्षीमित्र किंवा संघटना पक्ष्यांना वाचवण्याचे काम करतात. त्यापैकी काहींचे क्रमांक येथे देत आहोत.
अनिल हिरामण आवचिते (पुणे स्टेशन)- ९४२२३४९७८९
राजेंद्र परदेशी (हडपसर, वानवडी, फातिमानगर)- ९३२५०१००११
मनोज ओसवाल (पीपल फॉर अॅनिमल संघटना)- ९८९००४४४५५