कात्रज, नगर रस्ता, धनकवडी आणि मध्य पुणे (विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय) हे भाग शहरात मुलींच्या लिंग गुणोत्तरात पुढे असल्याचे समोर आले आहे. या चारही भागात मुलींच्या लिंग गुणोत्तराची आकडेवारी मुलांच्या दर हजार जन्मांमागे हजारपेक्षा अधिक असून आकडेवारीनुसार कात्रजमध्ये या वर्षी दर हजार मुलांच्या जन्मांमागे १२०४ मुलींचा जन्म झाला आहे. याउलट धायरीत मुलींचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे ५६० इतके होते.
पालिकेच्या ‘गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक दक्षता समिती’ची (पीसीपीएनडीटी) दुसरी बैठक सोमवारी झाली. या बैठकीत १ जानेवारी २०१५ पासून ३१ ऑक्टोबर २०१५ या कालावधीसाठीचा जन्मदर अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातील आकडेवारी ‘लोकसत्ता’ला मिळाली आहे. याबाबत पीसीपीएनडीटी कक्षाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र बैठकीत मांडण्यात आलेली आकडेवारी जन्म-मृत्यू कार्यालयाकडून घेतली असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष पीसीपीएनडीटी कक्षाने आकडेवारी गोळा केली नसल्यामुळे त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या जन्मदर अहवालानुसार या वर्षी शहरात एकूण १७,०१४ मुलांचा व १६,८५४ मुलींचा जन्म झाला व शहरातील मुलींचे एकूण लिंग गुणोत्तर दर हजार मुलांमागे ९९० मुली असे होते. घोले रस्ता (लिंग गुणोत्तर ९४८), टिळक रस्ता (९४२), भवानी पेठ (९६५), बिबवेवाडी (९४४) आणि औंध (९२३) येथे मुलींचे लिंग गुणोत्तर दर हजारी मुलांमागे नऊशेहून अधिक मुली असे राहिले. ढोले पाटील रस्ता, येरवडा, हडपसर, कोंढवा, कोथरुड आणि वारजे येथील मुलींचे लिंग गुणोत्तर ८५० ते ९०० या दरम्यान होते, तर वडगाव शेरी व रामवाडीत ते ८०० ते ८५० या दरम्यान राहिले.
धायरीत मुलींचे लिंग गुणोत्तर सर्वात कमी म्हणजे दर हजार मुलांच्या जन्मामागे ५६० मुली असे असल्याचे आकडेवारी सांगते. हिंगणे खुर्दमध्ये हे लिंग गुणोत्तर ६६६, तर कर्वेनगरमध्ये ते ७७७ होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील एकूण प्रसूतिगृहे  व त्यामध्ये मुलींचे लिंग गुणोत्तर ५० टक्क्य़ांपेक्षा कमी असलेली रुग्णालये यांची आकडेवारीही समितीच्या बैठकीत मांडण्यात आली. ती खालीलप्रमाणे-

वर्ष        एकूण प्रसूतिगृहे        स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर ५० टक्क्य़ांहून कमी असलेली रुग्णालये
२०११    ४२५                        २२
२०१२    ४२४                        २३
२०१३    ३९७                        २४
२०१४    ४५१                        २२
२०१५  ३९४                        २३

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birth rate of boys and girls in pune area
First published on: 22-12-2015 at 03:25 IST