नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत आणि भाजपचे सरकार यावे अशी लोकांची इच्छा असली, तरी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि भाजपच्या सरकारसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यासाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी सोमवारी केले. गुलटेकडी मार्केट यार्ड, गोखलेनगर वगैरे भागात शिरोळे यांच्या पदयात्रांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
मार्केट यार्ड येथील बसस्थानकापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. गंगाधाम सोसायटी, न्यू इरा सोसायटी वगैरे भागातून ही पदयात्रा काढण्यात आली. नगरसेवक श्रीनाथ भिमाले, सुनील कांबळे, मनीषा चोरबेले, मानसी देशपांडे, कविता वैरागे तसेच राजेंद्र शिळीमकर यांच्यासह यावेळी कार्यकर्ते मोठय़ा संख्यने उपस्थित होते. गोखलेनगर, पांडवनगर, वडारवाडी, जनवाडी, वडारवाडी या भागातही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. शिवाजी चव्हाण, विक्रम मराठे, आनंद मंजाळकर, नीता मंजाळकर, विलास सोनावणे, कृष्णा बहादूर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानामध्ये शिरोळे यांनी सकाळी हास्यक्लबला भेट देऊन तेथे येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. नगरसेवक दिलीप काळोखे, उदय जोशी, माऊली पासलकर, उदय लेले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणसम्राटांना धडा शिकवतील – पाटील
शिक्षणाच्या नावाखाली ज्यांनी शिक्षणव्यवस्थेचा बाजार केला आणि फक्त स्वत:चा स्वार्थ बघितला अशा राज्यातील तथाकथित शिक्षणसम्राटांना शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्वजण येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवतील, असा दावा पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. शिक्षणसंस्थांची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात शिक्षणाचा बाजार सुरू झाला आहे. सरकारचे भूखंड, विद्यार्थ्यांकडून देणग्या, त्यातून सुविधा आणि सुविधांसाठी लक्षावधी रुपयांचे शिक्षणशुल्क असा प्रकार करणाऱ्या शिक्षणसम्राटांना शिक्षणक्षेत्रातील सर्वजण धडा शिकवतील, असेही पाटील म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
भाजपचे सरकार येण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे – शिरोळे
मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि भाजपच्या सरकारसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यासाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे, असे आवाहन अनिल शिरोळे यांनी सोमवारी केले.
First published on: 08-04-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp anil shirole campaign election