राज्यसभा निवडणुकीकडे राज्यातील सर्व जनतेचं काल रात्रभर लक्ष लागून होतं. पण कोल्हापुरच्या पहिलवानाने ‘हाप की डाव’ (कुस्ती खेळातील डाव) टाकला आणि संजय राऊत सहाव्या क्रमाकांवर फेकले गेले. आता असाच हाप की डाव पुणे महानगरपालिकेत टाकायचा आहे, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

तर महापालिका निवडणुकीत यांनी १०० नगरसेवक कधी क्रॉस केले, हे कोणाच्याच लक्षात येणार नाही. त्यामुळे सर्वांनी तयारीला लागा. सप्टेंबर अखेरीस निवडणूक होऊ शकते, असे संकेत देखील चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिले. ‘ये तो एक झाकी है, पुणे महानगरपालिका बाकी है’ अशा घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

राज्यसभेच्या सहा जगांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे ३, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले. त्यामध्ये कोल्हापूर येथील शिवसेनेकडून संजय पवार आणि भाजपाकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांच्या निवडणुकीकडे सर्वांचं पक्ष लागलं होतं. यामध्ये धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या विजयानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं पुण्यात आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी कोथरूड तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत एका गाण्यावर ठेका देखील धरला. यावेळी खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.