प्रभागनिहाय जाहीरनामे डिसेंबर मध्यावधीस प्रसिद्ध होणार; शहर पातळीवर नियोजन

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जाहीरनाम्यासाठीही व्यूहरचना केली असून पक्षाच्या एकत्रित जाहीरनाम्याबरोबरच प्रभागनिहाय जाहीरनामे उमेदवार प्रसिद्ध करणार आहेत. प्रभागनिहाय जाहीरनाम्यांचे नियोजन शहर भाजपकडून झाले असून डिसेंबर महिन्याच्या मध्यात हे जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रभागांचे स्वतंत्र जाहीरनामे प्रकाशित करतानाच संपूर्ण शहराचाही जाहीरनामा पक्षातर्फे तयार करण्यात येत असून तोही याच कालावधीत प्रसिद्ध होणार आहे.

महापालिकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. विधानपरिषदेची धामधूम संपुष्टात आल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील राजकीय वातावरणही तापेल असा रंग आहे. निवडणुकीच्या दृष्टीने जाहीरनामे करण्याच्या हालचाली सर्वच पक्षांकडून सुरू झाल्या आहेत. त्या दृष्टीने पक्षाचा जाहीरनामा करण्याबरोबरच प्रत्येक प्रभागाचा वेगळा जाहीरनामा करण्याची कल्पना भाजपने काढली असून त्यानुसार काम सुरू झाले आहे.

त्या त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून एकेका प्रभागाचा सर्वागीण जाहीरनामा करण्यासाठीचे नियोजन भाजपने केले आहे. त्यानुसार ४१ प्रभागांचे जाहीरनामे करण्यात येणार आहेत. प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून, त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्या त्या प्रभागात काय व्हावे याचे चित्र या जाहीरनाम्यात असेल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली. शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची साधने असलेले रस्ते, बीआरटी, मेट्रो, पीएमपी सक्षमीकरण या बरोबरच घनकचऱ्याची समस्या सोडविण्याला जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षाच्या वतीने शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते. निवडणूक तयारीच्या दृष्टीने पक्षाची भूमिका, राज्य पातळीवर पक्षाने केलेली विविध विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आल्याचे गोगावले यांनी सांगितले. दरम्यान, प्रभागनिहाय महिला मेळाव्यांचेही स्वतंत्र पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.